नगर - नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या पाच तासांत जेरबंद करण्यात नगर पोलिसांना यश आले. शनिवारी मध्यरात्री सव्वाच्या दरम्यान तारकपूर बसस्थानकात ही कारवाई करण्यात आली. सव्वाआठ लाख रुपयांसह आरोपीला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बसवराज गुंडप्पा गायकवाड (मूळ राहणार अक्कलकोट, जि. सोलापूर, हल्ली राहणार पुणे) असे आरोपीचे नाव आहे. नाशिकस्थित व्यावसायिक जयकुमार केशरीमल दोशी यांच्याकडे तो काम करत होता. ३१ जानेवारीला वसुलीचे जमा झालेले सव्वाआठ लाख रुपये चोरून त्याने पोबारा केला. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले. निरीक्षक शशिराजन पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाशिकहून येणा-या सर्व बसेसची तपासणी तारकपूर बसस्थानकात सुरू केली. नाशिक-तुळजापूर बसमध्ये मध्यरात्री सव्वाच्या सुमारास आरोपी चोरलेल्या रकमेसह पथकाला सापडला. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.