आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Baning Borewell No Tanker Free Anna Hazare

बोअरबंदीविना टँकरमुक्ती नाही, अण्णा हजारे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - पाच शेते एक हजार फूट खोलीपर्यंत बोअरवेल खोदल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बोअरवेलवर निर्बंध आणल्याखेरीज टँकरमुक्ती अशक्य अाहे. बोअरवेलच्या पाणीउपशावर बंधन आणणारा कायदा होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे, गेली ४५ वर्षे 'पाणी आडवा पाणी जिरवा' या कार्यक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानावरही कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. असा खर्च आवश्यक असला, तरी जे पाणी अडवून भूगर्भात जिरवले, तरी त्या पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होणे आवश्यक होते. मात्र, तसे नियोजन झालेले नाही. भूगर्भात पाण्याचा साठा वाढल्याने लोकांचा स्वार्थ वाढला खेड्याखेड्यांमध्ये बोअरवेल घेण्याच्या स्पर्धाच सुरू झाल्या अाहेत. २०० पासून हजार फूट खोलीपर्यंतचे पाणी उपसले जाऊ लागले. त्याचाच परिणाम म्हणून भीषण पाणी टंचाईस सामोरे जाण्याची आपल्यावर वेळ आली आहे. शेतीला पाणी देणाऱ्या विहिरींची खोली जेमतेम ५० ते ६० फुटांपर्यंत असते. पिण्याच्या पाण्याच्या हातपंपाची खोली २०० फुटांपर्यंत असते. तथापि इतर बोअरवेलची खोली ५०० ते हजार फुटापर्यंत खोल गेल्याने विहिरी हातपंप कोरडे पडले. अडवलेले, जिरवलेले पाणी बोअरवेलमधून निघून गेल्याने ही वेळ ओढवली आहे. पाणी अडवणे, जिरवणे जेवढे महत्त्वाचे आहे त्याच बरोबर बोअरवेलमधून गावातून निघून जाणारे पाणी थांबवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गावातील बोअरवेल बुजवणे आणि नवीन बोअरवेल घेणे हाच एक पर्याय ठरू शकेल. उशिरा का होईना काही नेते मंडळी बोअरवेल बुजवण्याबाबत बोलू लागली आहेत ही टँकरमुक्त महाराष्ट्राची चाहूलच म्हणावी लागेल, असेही अण्णांनी म्हटले आहे. गावातील बोअरवेल बुजवण्यासाठी गावच्या लोकांची मानसिकता बदलावी लागेल. बोअर बुजवल्याशिवाय, पिक पद्धती बदलल्याशिवाय ठिबक सिंचन केल्याशिवाय गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, टँकरचा प्रश्न कधीही सुटणार नाही.
राळेगणसिद्धीत बोअरवेल बुजवण्यास प्रारंभ
मोठया प्रमाणावर जलसंधारणाची कामे होउनही राळेगणसिद्धीत टँकर बोलावण्याची वेळ आली. हे अपमानकारक वाटल्याने ग्रामस्थांनी बोअरवेल बुजवण्याचा निर्णय घेतल्याचे हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे. बोअरवेल बुजवण्यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात येउन तसा निर्णय घेण्यात आला. मार्च मध्ये बंद असलेले ११० बोअरवेल बुजवण्याचे काम सुरू झाले असून त्यानंतर मे जुन महिन्यात तीन ते चार तास सुरू राहणारे बोअरवेल वगळता इतर सर्व बोअरवेल बुजवण्यात येणार आहेत.
शब्दाला वजन नाही ?
गावात असलेल्या बोअरवेलच्या पाणी उपशावर कायदा करून त्या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आम्ही गेली २० वर्षे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जनतेला सांगत आहोत. मात्र त्या सांगण्याचा प्रभाव पडत नसल्याबददल हजारे यांनी खंत व्यकत केली आहे. ज्या अर्थी सांगण्याचा प्रभाव पडत नाही त्या अर्थी कदाचित आमच्या शब्दाला वजन नाही. आता शब्दाने सांगून नव्हे तर राळेगणसिद्धी परिवाराने सर्व बोअरवेल बुजवून प्रत्यक्ष कृती करून दाखवण्याचे ठरवले असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.