आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवरेला पाणी आल्यावर संगमनेरात श्रींचे विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : दैनिक दिव्य मराठीने प्रकाशित केलेले वृत्त.
संगमनेर - गणेश विसर्जनासाठी नदीला पाणी असावे ही संगमनेरकरांची मागणी प्रशासनाने फेटाळून लावल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद गणेशभक्तांत उमटले. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी शांतता समितीच्या बैठकीत वीज चोरीवरून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना फटकारल्याने संतप्त गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्रिपाठी यांचा निषेध नोंदवत आता प्रवरेला पाणी आल्यानंतरच गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संगमनेरात गणेश विसर्जनावरून पुन्हा २०१२ ची पुनरावृत्ती होणार आहे.

शांतता समितीच्या बैठकीत गणेश विसर्जनासाठी पाणी सोडले जाणार नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मूर्ती विसर्जन आेझर बंधाऱ्यात करण्याचा पर्याय ठेवला. यावर विचार करण्यासाठी मंडळाच्या आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (२१ सप्टेंबर) रात्री उत्सव समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी मानाच्या सोमेश्वर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पासाहेब खरे होते. पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांच्या वक्तव्यावरून बैठकीत पदाधिकारी आक्रमक झाले होते. नगरसेवक सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, कैलास वाकचौरे, अॅड. श्रीराम गणपुले, अमर कतारी, शौकत जहागीरदार, माजी नगराध्यक्ष कैलास लोणारी, माजी उपनगराध्यक्ष नीलेश जाजू, मुकुंद गरूडकर, भुपेश भळगट, सुदर्शन इटप, घनश्याम जेधे, प्रसाद गोरे, अंकुश बुब, राजेश आसोपा, सतीश आहेर आदींनी आपल्या भूमिका मांडल्या.
ओझर बंधाऱ्यात गणेश मूर्ती घेऊन जाव्या किंवा प्रशासनाकडे द्याव्या, प्रशासन त्यांचे विसर्जन करील अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली होती. २०१२ मध्ये नदीला पाणी नसल्याने संगमनेरकरांनी गणेश विसर्जन केले नव्हते. नदीला पाणी सोडल्यानंतरच विसर्जन करण्यात आले. त्यामुळे नंतरच्या दोन वर्षांच्या कालखंडात विसर्जनासाठी नदीला प्रशासनाने पाणी उपलब्ध करून दिले होते. यावेळी तब्बल ३२ दिवसांचे आवर्तन विसर्जनाआधी सोडत प्रशासनाने पाणी सोडण्यास असमर्थता दर्शवली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर विचार केल्यास चुकीचा पायंडा पडेल, असा सूर काहींनी लावला. शहरातून नदी वाहत असताना विसर्जनासाठी मूर्ती प्रशासनाकडे किंवा ओझरला नेणे हा पर्याय नाकारत विसर्जनासाठी नदीला पाणी असावे ही मागणी केली.

सत्ता आमची असली, तरी गावासोबत राहू
गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी पाण्यावरून संगमनेरात उदभवलेल्या परिस्थितीबाबत आपण चर्चा करू. विसर्जनासाठी २०१२ मध्ये पाणी असावे यासाठी आम्ही पुढे होतो. यावेळी सत्ता आमची असली, तरी आम्ही गावासोबत राहू. राधावल्लभ कासट, माजी नगराध्यक्ष.

विसर्जन करण्याचा निर्णय गावाचा
पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांनी वापरलेली भाषा संस्कृतीला धरून नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी तरुणांना कधीही चुकीची दिशा देत नाहीत. वेळ आल्यास सर्व गाव एक राहते. विसर्जन करण्याचा निर्णय गावाचा आहे. सर्वजण नदीपात्र स्वच्छ करून चांगल्या वातावरणात गणेशाला निरोप देऊ. विश्वास मुर्तडक, माजी नगराध्यक्ष.

सर्वाच्या भूमिकेसोबत मानाचे सोमेश्वर मंडळ
आधीपासूनच आपण पाण्यासाठी पाठपुरावा करायला हवा होता. यापुढील काळात सणांचे नियोजन करून आपणच संबंधितांशी पत्रव्यवहार करावे. आपल्याकडून चांगल्या पद्धतीने पाठपुरावा झाल्यास शासनाला विचार करावा लागेल. विसर्जनाबाबत सर्वाच्या भूमिकेसोबत मानाचे सोमेश्वर मंडळ राहील.'' किशोर पवार, उपनगराध्यक्ष.