आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Power Comes Together Against Municipality Junior Enginner

कारवाईच्या मागणीसाठी नारी शक्तीची एकजूट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गेली अनेक वर्षे महापालिकेच्या नगररचना विभागात ठाण मांडून बसलेल्या व नुकतीच बांधकाम विभागात बदली झालेल्या कनिष्ठ अभियंता के. वाय. बल्लाळ यांच्याविरोधात सर्वपक्षीय महिला एकवटल्या आहेत. या मुजोर अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी उपमहापौर गीतांजली काळे यांच्यासह महिला व बालकल्याण समिती सभापती किरण उनवणे, रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. प्रविणा घैसास आणि सामाजिक कार्यकर्त्या कमल गिरी आदींनी आयुक्तांकडे केली.

महापालिकेत काही अधिकारी स्वत:ला मालक समजतात. कनिष्ठ अभियंता बल्लाळ हे देखील त्यापैकी एक आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापती उनवणे यांच्या प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव बल्लाळ यांनी तयार करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्याने उनवणे यांच्या प्रभागातील विकासकामे रखडली आहेत. याबाबत जाब विचारला असता बल्लाळ यांनी उनवणे यांना उलट उत्तरे दिली. ‘मी काम करणार नाही, काय करायचे ते करून घ्या,’ असे सांगत अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर उनवणे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे बल्लाळ यांची तक्रार केली. परंतु आयुक्त विजय कुलकर्णी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एका महिला पदाधिकार्‍याला दिलेली अपमानास्पद वागणूक पाहून सर्व पक्षीय महिलांनी उपमहापौर काळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (11 ऑक्टोबर) आयुक्तांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर काळे म्हणाल्या, बांधकाम विभागात बदली झाल्यापासून बल्लाळ कामावर येत नाहीत. नगररचना विभागात असतानाही त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. आता बांधकाम विभागातही ते मग्रुरीने वागत आहेत. एका महिला पदाधिकार्‍याचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, तरी देखील आयुक्त त्यांना पाठीशी घालत आहेत. यापुढे बल्लाळ यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी; अन्यथा मंगळवारपासून (15 ऑक्टोबर) सर्वपक्षीय महिला आयुक्तांच्या दालनात बेमुदत उपोषण करतील, असा इशारा काळे यांनी दिला. प्रविणा घैसास म्हणाल्या, महानगरपालिका होऊन दहा वष्रे झाली, तरी शहरातील विकास कामे व नागरी सुविधांची पूर्तता झाली नाही. कामांची पूर्तता करण्यासाठी महिला प्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास त्यांना अरेरावीची भाषा वापरून टाळाटाळ करण्यात येते. यावेळी बिजा घोडके, हेमलता साळवे, उल्का बंगाळ, संगीता साळवे, योगिता थोरात, रजनी भोसले, सुरेखा वाघमारे, मंगल भिंगारदिवे, राणी देठे उपस्थित होत्या. दरम्यान, यासंदर्भात बल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी मला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले.