आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman\'s Name On Satbara Certificate Demand In Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातबार्‍यावर महिलेचे नाव बंधनकारक करा; मंत्री वर्षा गायकवाड यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महसूल विभागाने जमिनीच्या सातबार्‍यावर महिलेचे नाव ऐच्छिक ठेवले आहे. त्यात बदल करून महिलेचे नाव बंधनकारक करावे व तिच्या संमतीशिवाय जमिनीच्या व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देऊ नये, अशी मागणी महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.

जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी येथील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. महसूलमंत्री थोरात, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे या वेळी उपस्थित होते. व्यसनी पती पत्नीला अंधारात ठेवून जमिनीचे परस्पर व्यवहार करतात. त्यांना चाप बसवण्यासाठी सातबार्‍यावर महिलेची नाव बंधनकारक करावे. महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी करणार्‍यांना मोठी सवलत द्यावी. यातून महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याचे प्रमाण वाढेल. गायरान जमिनी महिलांना कसण्यासाठी अथवा उद्योगासाठी द्याव्यात, अशा मागण्या गायकवाड यांनी थोरात केल्या.

महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र इतर राज्यांच्या पुढे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्याने सर्वप्रथम घेतला. त्यानंतर केंद्राने हे आरक्षण 50 टक्क्यांवर नेले. पण यात समाधान मानण्याऐवजी महिलांनी सातत्याने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच शिक्षण, आरोग्य, अपत्य व पतीचे नाव लावण्यासंदर्भात महत्वपूर्ण बदल घडवणारे नवे महिला धोरण लवकरच येत आहे. शेवटची बैठक होणार असून नंतर मंजुरीसाठी हे धोरण मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.सुकन्या योजना पुढील अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीच्या नावावर सरकार 21 हजार 400 रुपये बँकेत ठेवणार आहे. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर एक लाख रुपये तिच्या हाती पडतील. बलात्कार, अँसिड हल्ला यासारख्या घटनांना बळी पडलेल्या महिलांना कायदेशीर सल्ला, उपचार व पुनर्वसन यासाठी प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये तरतूद करण्याबाबत विचार सुरु आहे. पुढील अधिवेशनात हा विषयही मंजूर होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अश्विनी बोरस्ते, अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष सविता मोरे, शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा आदी यावेळी उपस्थित होते.

मागण्यांबाबत ‘ब्र’ नाही
महिलांच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा तीन मागण्या मांडल्यानंतर मंत्री गायकवाड पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या. त्यांच्या अनुपस्थितीत मंत्री थोरात या मागण्यांबाबत काही ठोस आश्वासन अथवा किमान या मागण्यांचा परार्मश घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, थोरात यांनी या मागण्यांबाबत ‘ब्र’ही उच्चरला नाही. अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या भाषणावरून उपस्थितांमध्ये अंगणवाडीशी संबंधित महिलांचा भरणा अधिक असल्याचे स्पष्ट झाले.

शहरात बदल हवा : थोरात
नगर शहराची दुरवस्था झाली आहे. यात बदल हवा असेल तर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आवश्यक आहे. सध्या नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्या माध्यमातून सत्तेच्या पाच वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलता येईल. शहराचा आमदारही काँग्रेसचा झाला, तर आणखी फायदा होऊ शकेल. युतीची सत्ता राज्यात येणार नाही. त्यामुळे शहरात शिवसेनेचा आमदार निवडून दिल्यास नगरचा विकास कधीही होणार नसल्याचा टोला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार अनिल राठोड यांचे नाव न घेता लगावला.