नगर- हातभट्टी चोरल्याच्या संशयावरून आदिवासी युवकाला झालेल्या मारहाणीनंतर पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील महिला व युवकांनी हातभट्टी विक्रेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारला. लाकडी दांडके घेत युवक दारुचे अड्डे उद्ध्वस्त करत आहेत. संसारात विष कालवणारी दारू हद्दपार व्हावी, यासाठी महिलाही हिरीरीने यात भाग घेत आहेत.
दारू चोरल्याचा आरोप करून विक्रेत्याने आदिवासी युवकाला शनिवारी (3 मे) रात्री मारहाण केली. दारुला वैतागलेल्या ठाकरवाडीतील महिला व युवक रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले. त्यांनी हातभट्टीचे पाच अड्डे उद्ध्वस्त केले. सोमवारी सकाळी पुन्हा मोहिम उघडत दारूचे कॅन रस्त्यावर टाकून जाळण्यात आले. गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने दिवसभर काबाडकष्ट करून आलेल्या पुरुषांचा पैसा व्यसनावर खर्च होत असल्याची खदखद महिलांमध्ये होती. या प्रकरणाने ती उफाळून आली. दारूविक्री होऊ नये, यासाठी आदिवासी महिला व युवक गावातून दररोज गस्त घालत आहेत.