आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Complain In District Council Education Department

कक्ष अधिका-यांच्या अरेरावीविरुद्ध महिला कर्मचा-यांची लेखी तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील महिला कर्मचा-यांना कक्ष अधिकारी पी. एस. दौंड यांच्याकडून अरेरावी होत असल्याची तक्रार संबंधितांनी केली. दरम्यान, या तक्रारीची चौकशी महिला तक्रार निवारण समितीने केली असून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती समितीचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी दिली.
महिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, दौंड यांनी १४ ऑक्टोबर २०१४ रोजी हजेरी पत्रकात त्यांच्या नावासमोर उशिरा आल्याचा शेरा लिहिला. त्यामुळे संबंधित कक्ष अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांना बोलावून अरेरावीची भाषा वापरली. तुमच्यापैकीच कुणीतरी ‘लेट’ हा शब्द लिहिला असल्याचे ते दरडावून म्हणाले. यासंदर्भात महिलांनी जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे तक्रार केली. तथापि, अधिकाऱ्यांनीही प्रारंभी दखल घेतली नाही. त्यानंतर कक्ष अधिकाऱ्यांनी पुन्हा महिला कर्मचाऱ्यांना धारेवर धरून "माझे कुणीच काही करू शकत नाही' अशी भाषा वापरली.
यासंदर्भात पूर्वीही महिलांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु माफी मागितल्यानंतर संबंधिताला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाते. यापूर्वीदेखील एका महिलेला सभेचे इतिवृत्त लिहिताना कक्ष अधिकाऱ्याने त्रास दिला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. या कक्ष अधिकाऱ्याच्या मोठ्या आवाजात बोलण्यामुळे कार्यालयातील काही कर्मचारी त्रस्त आहेत. त्याचा परिणाम विभागाच्या कामकाजावर होत अाहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महिला असतानाही महिला कर्मचाऱ्यांना कक्ष अधिकाऱ्याकडून होणाऱ्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. तक्रारीची चौकशी करून अहवाल नवाल यांना सादर केला असल्याचे ससे यांनी सांगितले. नवाल याप्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.
तक्रारीत तथ्य नाही
महिलांनी केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य नाही. मी नियमानुसार वागतो. संबंधित महिला कर्मचारी माझ्या मुलीसारख्या आहेत. मी नियमानुसार वागत असल्याने माझ्या विरोधात खोटा अर्ज देण्यात आला.'' पी. एस. दौंड, कक्ष अधिकारी.