आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Doctor Rape Attempt Case In Shirdi Sai Baba Sansthan Hospital

शिर्डीत महिला डॉक्टरची छेड काढल्या प्रकरणी सहा सुरक्षारक्षक निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- साईनाथ रुग्णालयातील दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विनयभंगप्रकरणी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत दिरंगाई केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी मंगळवारी आंदोलन केले. संतप्त ग्रामस्थ घोषणाबाजी करत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात घुसले होते. आंदोलकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर आरोपींना तातडीने अटक केल्याबद्दल पोलिसांचे कौतुकही केले. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयातील सहा सुरक्षारक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. तसेच, दिरंगाई केल्याबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

आंदोलकांना शांत करत कार्यकारी अधिकारी रा. मा. जाधव यांनी ही कारवाई केली. तसेच दोन्ही रुग्णालयांत लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येईल व रुग्णांना भेटण्याच्या वेळाही निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले. मंगळवारी (दि. ११) रुग्णालयातील दोन प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांशी चार तरुणांनी गैरवर्तन केले होते, मात्र यासंदर्भात सोमवारी (दि. १७) दुपारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर शिर्डी पोलिसांनी काही तासांतच चारही आरोपींना ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणानंतर घाबरलेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांनी रुग्णालय सोडून जाण्याचा निर्णय घेतला, या सर्व प्रकरणाची ग्रामस्थांनी गंभीर दखल घेत पीडित डॉक्टरांना भेटून धीर देत रुग्णालय सोडून न जाण्याची विनंती केली.

मंगळवारी (दि. १८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गांधीगिरी आंदोलन केले. या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी ग्रामस्थांनी संस्थानच्या प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्रिसदस्यीय समिती व ग्रामस्थांचा कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवाद घडवून आणावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, कैलास कोते, राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, नितीन कोते, सचिन शिंदे, रवि गोंदकर, ताराचंद कोते यांनी संस्थानच्या दिरंगाईचा निषेध केला.

पीडित डॉक्टरांचा इनकॅमेरा जबाब
११ नोव्हेंबरला घडलेल्या घटनेची १७ नोव्हेंबरला तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी काही तासांतच चारही अारोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी (दि. १८) दोन्हीही पीडित डॉक्टरांचा राहाता न्यायालयात इमकॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. चारही आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.