आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेपत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : खासदार सुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चिडून बोलतात, पण मला त्यांना सांगावेसे वाटते, तुम्ही मुख्यमंत्री आहात, विरोधी पक्षनेते नाही. जर तुम्हाला जबाबदारी झेपत नसेल, तर राजीनामा द्या, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
राष्ट्रवादी भवनात सुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रशेख घुले, आमदार राहुल जगताप, अरुण जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, सभापती नंदा वारे, आशुतोष काळे आदी उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री नेहमीच चिडून बोलतात. पण तुम्ही विरोधी पक्षनेते नाही, तर मुख्यमंत्री आहात. जर जबाबदारी झेपत नसेल, तर राजीनामा द्या. आम्ही काहीच म्हणणार नाही. आमच्याकडे अनेक कर्तृत्ववान नेते आहेत, जे चिडताही चांगले काम करतात. आमचे बंधु अजितदादा आहेत, त्यांनाही चांगला अनुभव आहे, तेदेखील काम करतील.

सध्या मराठा, ओबीसी मोर्चे निघत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन आपण काम करतो. पण सध्याची परिस्थिती पाहून काही तरी विस्कळीत झाल्याचे जाणवते. ही भांडणे टीव्हीवर चर्चासत्र भरवून लावली जातात, असे सुळे म्हणाल्या. सध्या भाजपवाले खोटे बोल, पण रेटून बोल अशी भूमिका घेत आहेत. पंतप्रधान म्हणाले होते की, ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ मला वाटले भ्रष्टाचाराबद्दल बोलत असतील. पण आता कळले की ते कांद्याबद्दल बोलत आहेत. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यामुळे देशाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका सुळे यांनी केली. आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पक्ष निरीक्षक यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. आघाडी करायची किंवा नाही, हा निर्णयदेखील पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही सुळे यांनी सांगितले.

‘कोपर्डी’चेआरोपपत्र नाही
मुख्यमंत्री कोपर्डीला लपून-छपून गेले. त्यावेळी एक महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याबाबत त्यांनी सांगितले होते. परंतु अद्यापि आरोपपत्र दाखल झालेले नाही, असे सुळे यांनी सांगितले.
सत्ता राष्ट्रवादीकडेच
जि.प. ची किल्ली राष्ट्रवादीकडे आहे. आगामी निवडणुकीत ही किल्ली राष्ट्रवादीकडे राहिली पाहिजे. जि. प. ही आमची ताकद आहे. प्रचाराला मी येईनच, पण गुलाल मेळाव्याला बोलावले तर जास्त आनंद होईल, असेही सुळे यांनी सांगितले.

उद्धवजींना माफ करा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माफी मागावी लागली. मला वाटते, चूक झाली आणि माफी मागितली असेल, तर विषय सोडावा. रोज तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या पक्षाकडून एवढी मोठी चूक झालीच कशी, असा सवालही सुळे यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...