आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला स्वच्छतागृहांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरात महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समस्येकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. माजी महापौर शीला शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला, पण त्यांनी लक्ष दिले नाही. शहरात महिला स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होत असून महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात महिलांच्या स्वच्छतागृहासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी महिला संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

सोमवारी शहरातील विविध महिला संघटनांच्या वतीने महापालिकेसमोर हातात कुलूपे घेऊन निदर्शने करण्यात आली. महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत, या मागणीसाठी केलेल्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या कमल गिरी यांच्यासह माया जाधव, सुनंदा साठे, शीला पंडित, अनिता पाटोळे, पुष्पा जाधव, कमल लोंढे, सुरेखा तुपे, उषा म्हंकाळे, प्रतिभा त्रिभुवन, रेखा शिंदे, गीता कदम, संगीता कदम आदींसह कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या.

गिरी म्हणाल्या, रोटरी क्लबने महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यास पुढाकार घेतला होता, परंतु एका स्वयंसेवी संस्थेने निधी उभा करून स्वच्छतागृह उभे करणे ही शहराच्या व महापालिकेच्या दृष्टीने अतिशय शरमेची बाब आहे. स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा नाही, अशी सबब पुढे केली जाते. आम्ही महापालिकेच्या प्रतिनिधीला शहराच्या प्रमुख ठिकाणी जागा सुचवली, परंतु त्याचा विचार झाला नाही. मनपाकडे कोट्यवधींचा निधी मूलभूत गरजांसाठी येत असतो, परंतु स्वच्छतागृहांसारख्या अत्यावश्यक गरजेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात महिलांच्या स्वच्छतागृहासाठी निधीची तरतूद करावी व शहरातील प्रमुख चौकांत तसेच बाजारपेठेच्या ठिकाणी महिला स्वच्छतागृह उभारावे; अन्यथा महापालिकेतील सर्व अधिकारी व नगरसेवकांना गांधी टोपी देऊन गांधीगिरी केली जाईल. मनपाच्या दोन्ही स्वच्छतागृहांना टाळे ठोकले जाईल, असा इशाराही गिरी यांनी दिला. या वेळी वीरांगना महिला परिषद, विश्वक्रांती महिला महासंघ, आदिशक्ती महिला महासंघ, प्रगती महिला महासंघ, जागृती महिला महासंघाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

नगरसेविकांना आवाहन
महापालिकेत 50 टक्के महिला नगरसेविका आहेत. त्यांनी शहरात प्रमुख ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचा आग्रह धरावा. इतर मूलभूत सुविधांप्रमाणे महिलांच्या स्वच्छतागृहाचा विषयही तितकाच महत्त्वाचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार 40 माणसांमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असावे. ताज्या जनगणनेनुसार शहरात किमान दोन लाख महिला आहेत. पालिका हद्दीत महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही, हे अतिशय चिंताजनक आहे.’’ कमल गिरी, सामाजिक कार्यकर्त्या.

महिला स्वच्छतागृहाची वानवा
चार लाख लोकसंख्येच्या शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणार्‍या महिलांची कुचंबणा होते. मुख्य बाजारपेठ असलेल्या कापडबाजार परिसरात कुठेही स्वच्छतागृह नाही. बोटावर मोजण्याइतके स्वच्छतागृहे शहरात आहेत. आहे त्या स्वच्छतागृहांची स्वच्छता धोक्यात आल्याने त्यांचा वापर होत नाही. सरकारी व खासगी कार्यालयांतही आवश्यक संख्येत महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. यावर भूमिका घेऊन प्रo्न मार्गी लावण्यास कुणीही पुढे येण्यास तयार नाही.