आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - भारतातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढते आहे. एकीकडे खेडी ओस पडत आहेत, तर दुसरीकडे शहरांत झोपडपट्टय़ांचे प्रमाण वाढते आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भारत कर्जबाजारी झाला आहे. जनतेचे आर्थिक सक्षमीकरण सरकारच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अशा स्थितीत सहकार तत्त्वावर आधारित बचतगटच भारताला भविष्य देऊ शकतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा यांनी राळेगणसिद्धी येथे केले.
राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने आयोजित बचतगट मेळाव्यात त्या बोलत होत्या. मिश्रा म्हणाल्या, दुष्काळी परिस्थितीत भगिनी निवेदिता ग्रामीण विकास केंद्राद्वारे (बहादरपूर, जि. जळगाव) बचतगटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. आमच्याकडील 1 हजार 700 बचतगटांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील 20 हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. मागील वर्षी केवळ गोधड्या विकून या महिलांना 50 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. प्रत्येक महिलेला रोजगार कौशल्य आणि रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या संकल्पनेतून राळेगणसिद्धी, पानोली, पिंपळनेर, जातेगाव आदी पारनेर तालुक्यातील गावांमधील बचतगटांना गोधडी निर्मितीचे प्रशिक्षण लवकरच देण्यात येणार आहे. या गोधड्यांना बाजारपेठ मिळवून दिली जाईल, असे मिश्रा यांनी सांगितले.
या मेळाव्यास राळेगणसिद्धी, पानोली, पिंपळनेर, जातेगाव या गावांतील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. भगिनी निवेदिता केंद्राचे समन्वयक जगदीश पवार यांनी बचतगटांनी बनवलेल्या गोधड्या त्यांना दाखवल्या. गोधड्या कशा बनवल्या जातात, त्या तयार करताना कोणती काळजी घ्यायची हे त्यांनी सांगितले.राळेगणसिद्धी परिवाराच्या पुढाकारातून सुरुवातीला पारनेर तालुक्यात प्रातिनिधीक स्वरूपात गोधडीनिर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे विश्वस्त आणि मेळाव्याचे आयोजक अँड. श्याम आसावा यांनी यावेळी बोलताना दिली.
चरख्या ऐवजी गोधडी
खेड्यातच रोजगार मिळाला नाही, तर देश उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. गांधीजींच्या काळात चरख्याने शिकवलेला स्वाभिमान आता गोधडीसारख्या देशी उद्योगातून प्रज्वलित होईल, असा विश्वास हजारे यांनी यावेळी व्यक्त केला. महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्या आदर्शांना अनुसरून मिर्शा यांनी केलेले काम संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक असल्याचे त्यांनी नमूद केले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.