नगर- सावेडी उपनगरात बुधवारी सायंकाळी अवघ्या तासाभरात नऊ महिलांच्या गळ्यातील दागिने धूमस्टाइल लांबवण्यात आले. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने चेन स्नॅचिंगचे गुन्हे होण्याची नगरमधील हा पहिलीच घटना. मध्यंतरी थंडावलेले चेन स्नॅचिंगचे प्रकार केवळ पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा सुरु झाले असल्याची टीका महिलावर्गातून होत आहे. ऐन सणासुदीत हा प्रकार घडल्यामुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी (३ सप्टेंबर) सायंकाळी सहा ते साडेसातच्या सुमारास सावेडीत मंगळसूत्र चोरीच्या नऊ घटना घडल्या. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात एकामागोमाग तक्रार देण्यासाठी महिला आल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तक्रार देणाऱ्या महिलांनी केलेल्या आरोपींच्या वर्णनानुसार सर्व गुन्हे एकाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
शोभा सुरेंद्र रोहिटिया (६०), डॉ. कुमदिनी भोसले, कविता गुंजकर, शीतल वाघ, मनीषा गालम यांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. गौरीपूजन असल्याने हळदीकुंकू कार्यक्रमासाठी महिला नातेवाइकांकडे, मैत्रिणीकडे निघाल्या होत्या. पायी जात असताना चोरट्यांनी दागिने हिसकावून पोबारा केला. सावेडी उपनगरातील रासनेनगर, गुलमोहोर रस्ता, सोनानगर चौक, कोहिनूर मंगल कार्यालय, शिलाविहार या ठिकाणी पायी चालणा-या ९ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले.
वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नसलेल्या पल्सर मोटारसायकलीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी दागिने हिसकावल्याचे महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. तासाभराच्या कालावधीत एकूण सुमारे २५ ते ३० तोळे सोने चोरीला गेले. रासनेनगर चौकात आरडाओरडा झाल्यानंतर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. पोलिस निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
पोलिसांची हतबलता
मंगळसूत्र चोरीची पहिली घटना घडताच संबंधित महिलेने तोफखाना पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर आणखी तीन महिला मंगळसूत्र चोरीची तक्रार घेऊन एकापाठोपाठ तेथे आल्या. घटनेचे गांभीर्य पाहता ठाणे अंमलदारांनी वायरलेसवरुन बीट मार्शल्सना गस्त घालण्याबाबत संदेश देण्याची सूचना करणे अपेक्षित होते, पण त्यातही दिरंगाई झाली. महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या, तेव्हा तेथे एक महिला अधिकारी उपस्थित होती. महिलांनी त्यांना तातडीने गस्त घालण्याची विनंती केली, पण त्यांनीही बाहेर निघून जात हतबलता दर्शवली.