आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बचत गटांच्या आशेवर फिरले "पाणी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे; परंतु अवकाळी पावसामुळे प्रदर्शनाचा फज्जा उडाला. राज्यभरातील बचत गटांनी आणलेले साहित्य भिजल्याने फायद्याच्या आशेने आलेल्या अनेकांच्या पदरी निराशा आली.
१४ नोव्हेंबरला सायंकाळपासून तापडिया कासलीवाल मैदानावर सुरू झालेल्या पावसामुळे प्रदर्शनातील स्टॉल्समध्ये पाणी साचले होते. मंडप पूर्णपणे गळत असल्याने जिकडे तिकडे पाणी साचले आहे. चिखल तुडवत बचत गटाचे सदस्य आपले साहित्य पाहण्यासाठी गेले. प्रदर्शनात खाद्यपदार्थांचे ५० हून अधिक स्टॉल्स आहेत. पीठ भिजल्यामुळे गटांचे मोठे नुकसान झाले आहे. भाज्यांच्या स्टॉल्सवरील भाज्या सडल्या, तर डाळी भिजल्या, मसाल्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर येथील बचत गटाने दही-थालपिठाचा स्टॉल लावला होता. त्यांनी जवळपास एक टन पीठ तयार करून आणले होते. मात्र, त्यापैकी ३० किलो पीठ भिजले. गटाच्या अध्यक्षा कल्पना थोरात या नुकसानीमुळे हवालदिल झाल्या होत्या. संजयनगरातील फैज बचत गटाच्या अध्यक्षा नसिमा बेगम म्हणाल्या, मुळातच गुरुवारी प्रदर्शन सुरू झाले. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार हे दोन दविस फारसे ग्राहक फिरकले नाहीत.

पोकळ दिलासा
पाऊस काही आमच्या हातचा नाही. पावसाचे अंदाज घेऊनच नाेव्हेंबरमध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मात्र, पावसाने ऐनवेळी धोका दिला. मंडपावर पत्रे टाकणे शक्य नाही. आता पाऊस थांबेपर्यंत वाट पाहण्याशिवाय मार्ग नाही.
विकास बेदमुथा, उपायुक्त.

आम्ही हताश झालो
पाथर्डी येथे आम्ही आताच बचत गट स्थापन केला आहे. वेगवेगळी उत्पादने आणि कार्यपद्धती पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र, पावसामुळे प्रदर्शनात मोठे नुकसान झाल्याचे पाहून हताश होऊन परतावे लागत आहे.
शकुंतला कोरवणे, रमाई बचत गट.

बातमी कशाला...
नैसर्गिक संकटामुळे प्रदर्शन होऊ शकत नाही. त्यात आमचा काय दोष आहे, बातमी कशाला करता, असे प्रश्न बेदमुथा यांनी केले. बचत गटाच्या सदस्या आपल्या नुकसानाची करुण कहाणी सांगत असताना बेदमुथा त्यांच्यावर दबाव आणून दोन दविसांत किती फायदा झाला ते सांगा, असा जाब विचारत होते. तुमचे नुकसान झाले नाही, असेही त्यांना दरडावण्यात आले.