नगर - कामगार दिन महाराष्ट्र दिन लाल बावटा युनियनच्या कार्यालयात साजरा झाला. ज्येष्ठ नेते शंकर न्यालपेल्ली यांच्या हस्ते लाल झेंडा फडकवून कामगार एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी १४ मे रोजी कामगार संघटना आंदोलन करणार अाहेत.
न्यालपेल्ली म्हणाले, अनेक वर्षे आंदोलन, संघर्ष करून कामगारांना कामगार कायदे आर्थिक हक्क मिळाले आहेत. केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यानंतर कामगारांचे हक्क, कायदे यामध्ये अनेक बदल झाले आहेत. कामगारांना त्यांचे आर्थिक हक्क कायदेशीर हक्क मिळत होते, परंतु केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे या हक्कांपासून कामगारांना वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार असून या प्रश्नावर देशातील सर्व मध्यवर्ती कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात सर्व उद्योगधंद्यांतील कामगारांनी सहभागी व्हावे.
अॅड. सुधीर टोकेकर म्हणाले, केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतजमिनीपासून वंचित राहावे लागणार आहे. ग्रामीण शहरी भागातील जमिनी सरकार मोठ्या प्रमाणात ताब्यात घेणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. या वेळी कमलाबाई दोंता, लक्ष्मी कोटा, कमल गेंट्याल, लीलाबाई रासकोंडा, शोभा बिमन, शारदा बोगा, श्यामला मायकल, चंद्रकांत मुनगेल आदींसह विडी कामगार महिला कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.
कामगार देणार लढा
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींपासून वंचित करण्यासाठी भूमी अधिग्रहण कायदा अमलात आणू नये, यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष अन्य कामगार संघटना येत्या १४ मे रोजी देशव्यापी सत्याग्रह, मोर्चा, रास्ता रोको धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शेतकरी, कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अॅड. सुधीर टोकेकर यांनी या वेळी बोलताना केले.