आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत भीषण पाणीटंचाईच्या झळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - शेवगाव-पाथर्डी शहरासह दोन्ही तालुक्यांतील 150 पेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी जलाशयातील जलसाठा संपल्याने मृतसाठय़ातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांवर भीषण पाणीटंचाईचे संकट आले आहे. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. जायकवाडी जलाशयाचा मृत पाणीसाठा 26 दशलक्ष घनफूट असून पाणलोट क्षेत्रातील अवैध उपसा करणार्‍या पंपामुळे दररोज पाणीसाठय़ात घट होत आहे. त्यामुळे जलाशयाचा बराचसा भाग उघडा पडला आहे.

सध्या शेवगाव-पाथर्डीसह 54 गावे, शहरटाकळीसह 28 गावे, बोधेगाव व 10 गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या शिवाय टँकरने अनेक गावे वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. 2006 मध्ये 1 लाख 37 हजार 104 लोकसंख्या गृहीत धरून शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ योजना करण्यात आली. या योजनेत शेवगाव तालुक्यातील 31 गावे व पाथर्डीतील 23 अशा एकूण 54 गावांचा समावेश होता. सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. परंतु केवळ योजना कालबाह्य झाल्याने उपसा व वहन क्षमता कमी झाल्यामुळे शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक योजना अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जायकवाडीतील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागल्याने चराद्वारे पाणी उपसा करून विहिरीत घेतले जात आहे. नळाला गाळमिर्शित पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याने साथीचे आजार वाढले असून कावीळ, पोटदुखी, अतिसार, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे खासगी व सरकारी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात रुग्णांची गर्दी होत आहे. जुनी जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यानेही पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दूषित असूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाचा बेजबाबदारपणा तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावाने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे.


240 अश्वशक्तीच्या पंपाची जलाशयावर गरज
2011 मध्ये असलेली 1 लाख 46 हजार 840 लोकसंख्या सध्या 2 लाखांपेक्षा जास्त झाली. योजनेचा संकल्पन कालावधी संपून 7 वष्रे झाली. उद्भवावरील पंप 215 अश्वशक्तीचा आहे. परंतु हा पंप कालबाह्य झाला आहे. त्यामुळे उद्भवावर 10 कोटी लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या 240 अश्वशक्ती पंप बसवण्याची गरज आहे.
दूषित पाण्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
तीव्र पाणीटंचाई काळातही प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. चार-पाच दिवसांतून एकदाच पाणी मिळते आणि तेही अशुद्ध. जलशुद्धिकरण होतच नाही. दुर्गंधीयुक्त, पिवळसर रंगाचे गाळमिर्शित पाणी नळाद्वारे येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.’’ सुनील रासने, सामाजिक कार्यकर्ते.