आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्‍तीतील रोमहर्षक लढतीत योगेश पवार ठरला विजेता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पहिलवान सोमनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ झालेल्या कुस्ती स्पध्रेचे विजेतेपद नेप्ती येथील योगेश पवार याने पटकावले. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यपालसिंग यांच्या हस्ते 1 लाख रुपये रोख व चांदीची गदा त्याला प्रदान करण्यात आली. सारोळा कासारचा मल्ल विष्णू खोसे स्पर्धेचा उपविजेता ठरला. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 200 मल्लांनी भाग घेतला. स्पर्धेत झालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 81 कुस्त्या निकाली झाल्या.

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात नालेगाव ग्रामस्थांतर्फे पहिलवान सोमनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम लढत योगेश पवार व विष्णू खोसे यांच्यात झाली. पवारने रोमहर्षक विजय मिळवला.

कुस्ती स्पध्रेचे आयोजक पहिलवान संभाजी लोंढे म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मानाची कुस्ती जिल्ह्यातील पहिलवानांमध्येच लावण्यात आली. कुस्ती स्पर्धेचे आयोजक सुभाष लोंढे, राम लोंढे, अक्षय कर्डिले, युवराज करंजुले, धनंजय खर्से, प्रवीण घुले, शिवाजी चव्हाण, राजू बुगे, अर्जुन शेळके, चंदू बोर्डे, बलभीम शेळके, बाळू वाघ, विलास धांडे, राम नळकांडे, बंडू शेळके यांच्यासह कुस्ती शौकीन व मल्ल मोठय़ा संख्येने या वेळी उपस्थित होते.

पहिलवानाने चारित्र्यही कमवावे
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्तीपटू सत्यपालसिंग म्हणाले, पहिलवानाने मेहनत घेतल्यास त्याला यश नक्कीच मिळते. परंतु केवळ मेहनत व यश महत्त्वाचे नसते तर पहिलवानाने चिकाटी, मेहनतीसह स्वत:चे चारित्र्य जपणेही तितकेच महत्त्वाचे असते. या वेळी आयोजक संभाजी लोंढे यांनी महापौर केसरी कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

कुस्तीला 5 ते 6 सुवर्णपदके मिळवून देण्याचा मानस
महाराष्ट्राने कुस्तीला नावलौकिक मिळवून दिला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत या वेळी कुस्तीला 5 ते 6 सुवर्णपदके मिळवून देण्याचा मानस आहे. पहिलवान सोमनाथ लोंढे यांच्या नावाने कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जात आहे, ही आनंदाची बाब आहे.’’ सत्यपालसिंग, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू.