आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिकता जागवणारा ‘शन्नां’चा दिवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘दिव्यांच्या रोषणाईत आणखी एक दिवा लावण्यापेक्षा तो अंधारात लावावा, अंधाराला आनंद होतो, त्यापेक्षा दिव्याला अधिक आनंद होतो..’ हा संदेश दिला होता दिवंगत ज्येष्ठ लेखक शं. ना. नवरे यांनी. त्यांच्या हस्ताक्षरातील हे पत्र जामखेड येथील पोपटलाल हळपावत यांनी सांभाळून ठेवले आहे.

हळपावत यांना नाणी, तिकिटे, वस्तू व गारगोट्यांबरोबरच वेगवेगळ्या व्यक्तींची हस्ताक्षरे गोळा करण्याचा छंद आहे. त्यासाठी 2008 मध्ये त्यांनी शं. ना. नवरे यांना पत्र पाठवले होते. या पत्राला त्यांना उत्तर देताना संदेशही पाठवला, ज्यात त्यांच्या लिखाणाचे, सामाजिक बांधिलकीचे र्मम दडले होते.

ही आठवण जागवताना हळपावत म्हणाले, शन्नांचे शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष असे. मी पत्रात त्यांचा परिचय देताना ‘जेष्ठ’ साहित्यिक असा शब्द लिहिला होता. त्यांनी ‘जे’ वर लाल शाईने रेघ मारून ‘ज्ये’ अशी दुरुस्ती केली होती.

शन्ना यांचे लेखन जितके सदाबहार होते, तितकेच मनानेही ते उमदे होते. मराठी साहित्यसृष्टीत ‘आनंदाचे झाड’ लावणारे शन्ना आज आपल्यात नाहीत. त्यांची स्मृती महाराष्ट्र साहित्य परिषदेची जामखेड शाखा व जिल्ह्यातील साहित्य रसिक सदैव जपतील, असे हळपावत यांनी सांगितले.