आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाचे शुद्धिकरण हेच आर्थिक विषमतेवर औषध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाजात वाढत चाललेली विसंगती व विषमतेवर खरे औषध पैशाचे किंवा भांडवलाचे शुद्धिकरण हेच आहे. त्यामुळे व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सर्वांनी अर्थक्रांतीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक व अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर यांनी केले.

संपदा विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना मालकर शुक्रवारी ‘पैसा झाला मोठा’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव व उद्योजक अरुण कुलकर्णी होते. अर्थक्रांती म्हणजे काय याबाबत मालकर यांनी सखोल माहिती दिली. त्यातून देश आर्थिकदृष्ट्या खर्‍या अर्थाने कसा संपन्न होईल, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्याचा साठा, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, अनेक आर्थिक निकषांत जगात पहिल्या दहा देशांत स्थान, तसेच जगातील सर्वाधिक तरुण असलेला हा खर्‍या अर्थाने समृद्ध असा आपला देश केवळ आर्थिक व्यवस्थापनाअभावी मागे पडला आहे. हा प्रश्न भारतीय नागरिकांच्या वृत्तीशी संबंधित नाही, तर त्याला सध्याच्या व्यवस्थेने हतबल केले आहे. त्यामुळे भारतीय समूहांना बदनाम न करता पैशांच्या शुद्धिकरणाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.

पैसा हे विनिमयाचे साधन आहे. शरीरात रक्त जसे सतत प्रवाहित असते, त्याप्रमाणे पैसाही आर्थिक संस्थांच्या माध्यमातून खेळता राहिला पाहिजे. एक उद्योगपती साडेचार हजार कोटींचा बंगला बांधतो. राजकारण्यांकडे असलेला प्रचंड पैसा, 22 हजार टन सोन्यात अडकलेला पैसा, बँकिंग क्षेत्रात केवळ 42 टक्के गुंतवणूक म्हणजे 58 टक्के अडकलेला पैसा यामुळे देशाची आजची अवस्था झाली आहे. आपल्याकडे असलेले निम्मे सोने जरी भांडवलाच्या रूपाने खुले झाले, तर देशासमोर सार्वजनिक जीवनात असलेले प्रश्न चुटकीसारखे सुटतील, असे ते म्हणाले.

पैसा खेळता ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांना अर्थक्रांती चळवळ संबोधले जाते. सध्याची गुंतागुंतीची करव्यवस्था सुटसुटीत करणे, मोठय़ा नोटा रद्द करणे आणि देशातील सर्व व्यवहार बँकांमार्फत होण्याची व्यवस्था करणे या अर्थक्रांतीच्या प्रस्तावात देश मुळातून बदलण्याची ताकद आहे. या प्रस्तावांमुळे भांडवलाचे शुद्धिकरण होऊन लाचारी, तसेच मुजोरीतून भारतीय समाज बाहेर पडून तो प्रामाणिक व समाधानी आयुष्य जगू शकेल, असे मालकर यांनी नमूद केले.

राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात आर्थिक मूलभूत बदल होण्याची गरज होती. अर्थक्रांती प्रस्तावाच्या चर्चेमुळे आता तो बदल दृष्टिपथात आला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या प्रस्तावांचा समावेश करण्याचे सूतोवाच केले आहे. हा बदल होईल, तेव्हा खर्‍या अर्थांने स्वाभिमानी समाज उभा राहील, असे मालकर म्हणाले.

प्रास्ताविक अशोक सोनवणे यांनी केले. सावकार वाघमोडे यांनी स्वागत केले. यावेळी अविनाश बोपर्डीकर, प्रवीण बजाज, मिलिंद गंधे, कारभारी भिंगारे, अरविंद पारगावकर, शरदकुमार झंवर, विनोद बजाज, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर, विश्वनाथ लाहोटी उपस्थित होते. उज्‍जवला पंडित यांनी सूत्रसंचालन केले. सुचेता मुळे यांनी आभार मानले.