आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक क्षेत्र आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अभ्यासावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- समाजशास्त्रे ही संपूर्ण समाजातील प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अभ्यासली जावीत, जेणेकरुन मानवी जीवनाच्या सर्वच अंगांचा अभ्यास एका वेगळ्या अर्थाने प्रकट होईल, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांनी नुकतेच येथे केले.

न्यू आर्टस्, कॉर्मस अँड सायन्स महाविद्यालयातील सामाजिक अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते ‘सामाजिक शास्त्रात आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाची गरज’ याविषयावर व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भास्कर झावरे होते. कोणत्याही समाजशास्त्राचा अभ्यास करताना इतर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास केल्याशिवाय त्या ज्ञानशाखा समृद्ध होणार नाहीत. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करताना इतर सामाजिक शास्त्रांचासुद्धा त्यामध्ये समावेश असावा. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे. हे आव्हान नव्या पिढीने स्वीकारावे, असे आवाहन डॉ. सुमंत यांनी केले.

प्राचार्य झावरे म्हणाले, भारतातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास परदेशातील अभ्यासक करतात तेव्हा ते आपल्याला माहिती होते. आपल्या समाजातील प्रश्नांचा आपले समाजशास्त्रज्ञ गांभीर्याने विचार व संशोधन करत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपण आपल्या भागातील सामाजिक प्रश्नांचे संशोधन करण्यास कमी पडत आहोत. त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर कला शाखेचे उपप्राचार्य यू. आर. ठुबे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एम. व्ही. गिते आदी उपस्थित होते. डॉ. मोहनराव देशमुख, डॉ. बा. बा. पवार, डॉ. किसनराव अंबाडे, अशोक चोथे, नागेश शेळके, भरत होळकर, गणेश निमसे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बी. पी. जगताप यांनी केले, तर आभार प्रा. अमन बगाडे यांनी मानले.