आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावर्ती भागातील येळ्ळूरच्या घटनेचा शिवसेनेकडून निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे- महाराष्‍ट्राच्या सीमावर्ती भागातील येळ्ळूर येथे पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार केल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. नेवाशात बुधवारी कर्नाटक शासनाच्या विरोधात घोषणा देत घटनेचा निषेध म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील येळळूर येथे न्यायालयाचा निकाल येण्याआधी कर्नाटक प्रशासनाने येथील महाराष्‍ट्र राज्य येळळूर हा फलक दडपशाहीने हटवला.
सीमावर्ती मराठी बांधवांनी तो पुन्हा उभा करून मराठी अस्मिता कायम ठेवली. परंतु हा फलक उभारण्यात आल्याने बिथरलेल्या कर्नाटक पोलिसांनी गुंडगिरी करत बेछुट लाठीमार केला. मराठी बांधवांना घरातून बाहेर काढून आबाल-वृद्ध, महिला, पुरुषांना अमानुष मारहाण केली. उभारण्यात आलेला फलक काढण्यात आला.
नेवाशात बुधवारी शिवसैनिकांनी याचा निषेध केला. शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, उपशहरप्रमुख जालिंदर गवळी, पप्पू परदेशी, ग्रामपंचायत सदस्य गोरख घुले यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक शासनाच्या निषधार्थ घोषणा देत तहसीलदार हेमलता बडे यांना निवेदन दिले. येळळूर येथील घटनेचा आम्ही निषेध करतो. महाराष्‍ट्र शासनाने बोटचेपी भूमिका न घेता कर्नाटक शासनास मराठी अस्मितेचा बाणा दाखवावा. सीमावर्ती भागातील मराठी माणसावरील अन्यायाविरुद्ध त्वरित पाऊल उचलावे, असे निवेदनात नमूद केले. निवेदनावर जमीर देशमुख, निरज नांगरे, युवा सेनेचे मनोज पारखे, राजेंद्र देवरे, महेश पंडुरे, दीपक इरले, सागर खंडाळे आदींच्या सह्या आहेत.