आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड सोपानचा पुणे पोलिसांना गुंगारा, स्वस्तिक बसस्थानकावरील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - येरवडा तुरुंगातील कैदी सोपान गाडे (२८, विवेकानंदनगर, ता. नेवासे, जि. नगर) पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. ही घटना स्वस्तिक बसस्थानकावर मंगळवारी रात्री घडली. खटल्याच्या सुनावणीसाठी सोपानला नेवासे कोर्टात नेण्यात आले होते. परत नेत असताना त्याने पलायन केले. या घटनेमुळे नेवाशातील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

सोपान हा कुख्यात वाळूतस्कर अण्णा लष्करे टोळीतील आहे. अण्णा लष्करेचा खून झाल्यानंतर दोनच दिवसांत विरोधी टोळीतील असिफ पटेलचा खून झाला होता. लष्करेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गाडेनेच हा खून केला. या गुन्ह्यात गाडेसह काही आरोपींना अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच या खटल्याचा निकाल लागून गाडेसह इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे गाडेची रवानगी काही दिवसांपासून येरवडा कारागृहात झाली होती. असिफ पटेल खूनप्रकरणी अटक केल्यानंतर काही दिवस गाडेला नेवासे कारागृहात ठेवण्यात आले होते. याच कालावधीत तहसील कार्यालयाच्या आवारात अॅड. रियाज पठाण या वकिलाचा खून झाला. तपास नेवासे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे देण्यात आला. हा गुन्हा घडवून आणण्यामागेही गाडे हाच मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शिवाय अॅड. पठाण यांच्यावर गोळ्या झाडणारा प्रवीण खरचंद हा अल्पवयीन नसल्याचेही समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेने गाडेसह प्रवीण खरचंद याला अटक केली. वकिलाच्या खुनाच्या गुन्ह्यात गाडे याच्यासह ११ आरोपी आहेत. या गुन्ह्याचा तपास किचकट असल्यामुळे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. नंतर राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. याप्रकरणी नेवासे कोर्टात दोषारोपपत्र सादर होऊन खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. याचा खटल्याच्या कामकाजासाठी गाडेला येरवडा कारागृहातून नेवाशाला नेले जाते. यापूर्वीही त्याला पुणे मुख्यालयातील पोलिस कर्मचारी घेऊन येत असत. मंगळवारी मात्र त्याने गुंगारा दिला.

हलगर्जीपणाच भोवला
जन्मठेपेचीशिक्षा भोगत असलेला सोपान गाडे हा कुख्यात गुंड आहे. त्यामुळे त्याची कोर्टाच्या कामकाजासाठी ने-आण करण्यात येरवडा कारागृह प्रशासनाने खबरदारी घेणे अपेक्षित होते. पण, तसे झाले नाही. त्यांनी मुख्यालयातील अवघ्या तीन पोलिसांवर त्याची ने-आण करण्याची जबाबदारी सोपवली. यापूर्वीही गाडेला कोर्टाच्या कामकाजाकरिता आणत असताना त्याला व्हीआयपी वागणूक मिळत असल्याची चर्चा हेाती. त्यामुळे गाडेला पळून जाण्यासाठी पुणे पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणाच भोवला असल्याचे दिसून येते.

असा दिला गुंगारा
सोपानगाडेला कोर्टाच्या कामकाजासाठी पुणे मुख्यालयाचे तीन पोलिस घेऊन आले होते. खास वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्याला एसटी बसमधूनच आणले नेले जात होते. मंगळवारी तीन पोलिस त्याला बसने नेवाशाला घेऊन आले. सायंकाळी पुन्हा बसनेच माघारी घेऊन जात होते. स्वस्तिक बसस्थानकावर आल्यानंतर गाडेने लघवीला जाण्याचा बहाणा केला. नंतर पोलिसांना हिसका देऊन हातातील बेडी काढून तो पळाला. पोलिसांनी आरडाओरडा केला, पण गाडे अंधाराचा फायदा घेऊन गुंगारा देण्यात यशस्वी झाला.

त्यांची चूक यांच्या माथी
कोर्टाच्या कामकाजासाठी सोपान गाडेची ने-आण करण्यात पुणे पोलिसांनी हलगर्जीपणा केला, हे उघड आहे. पण, त्याचा शोध घेण्याची जबाबदारी आता नगर पोलिसांवर आली आहे. किमान त्याला नगरला पाठवताना येथील पोलिसांशी समन्वय साधला असता, तर त्याची सुरक्षा व्यवस्था कडक करता आली असती. पण, नगर पोलिसांनाही कसलीच कल्पना नसल्यामुळे तेही अनभिज्ञ होते. आता पुणे पोलिसांच्या चुकीमुळे नगरचे पोलिस मात्र कामाला लागले आहेत. गाडेच्या शोधाकरिता नगर पोलिस शोधमोहीम राबवत आहेत.

पुन्हा दहशतीचे सावट
वाळूतस्करअण्णा लष्करे याचा खून झाल्यानंतर त्याची टोळी नेस्तनाबूत होईल अशी अपेक्षा होती. या टोळीतील बहुतांश आरोपींवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती. काहींवर तडीपारी, हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. नेवासे, सोनई, श्रीरामपूर, कोपरगाव या भागात या टोळीची दहशत आहे. पण, लष्करे याच्या खुनानंतरही नेवाशातील तणावाचे वातावरण कायम राहिले. आता सोपान गाडे पळून गेल्यामुळे लष्करेची उर्वरित टोळी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.