नगर- येथील युवा चित्रकार-शिल्पकार शुभंकर व मोना कांबळे यांच्या कलेचे कॉमेडी किंग
कपिल शर्मा यांनी कौतुक करून त्यांच्या कला कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. मुंबईच्या फिल्मसिटीतील स्टुडिओत कलर्स वाहिनीवरील "कॉमेडी नाईट विथ कपिल' या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून शुभंकर व मोना कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जाताना शुभंकर यांनी
कपिल शर्मा यांचे, तर मोना यांनी कपिलच्या आईचे रेखाटलेले पेन्सिलचित्र सोबत नेले होते. चित्रीकरण संपल्यानंतर त्यांनी कपिल शर्मा यांची भेट घेऊन दोन्ही चित्रे त्यांना दाखवली. ही चित्रे त्यांना खूप आवडली. "बडा प्यारा बनाया है, थँक्यू सो मच फॉर लव्ह' असे म्हणत कपिलने त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांच्या कलेचे कौतुक केले. कपिलने
आपल्या आईचे चित्र स्वत:कडे ठेवून घेतले, तर स्वत:चे चित्र सही करून शुभंकरच्या संग्रहासाठी परत दिले.
शुभंकरने यापूर्वी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, पंडित हरिप्रसाद चौरसिया, गायिका उषा मंगेशकर, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, गायक यो यो हनिंसिंग, अभिनेत्री प्रियंका चोपडा, सई ताम्हणकर, सयाजी शिंदे यांची पेन्सिल चित्रे रेखाटली आहेत. पाइपलाइन रस्त्यावरील स्टुडिओत ही सर्व चित्रे ठेवण्यात आली असून रसिकांना ती पाहता येतील