आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Be Active For Changing The Nation : Amir Khan

देशात बदल घडवण्‍यासाठी युवा वर्गाने कृतीशील बनावे : आमिर खान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘नामुमकीन भी मुमकीन होवे, करके देख रे, राही निकल पडो रे...’ या गीतावर ठेका धरत अभिनेता आमिर खानने देशाला बदल हवा आहे. युवा पिढीने त्यासाठी कृतिशील बनावे, असा मंत्र दिला.
‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीतून स्नेहालय संस्थेने शोषित महिलांसाठी उभारलेल्या सत्यमेव जयते भवनाचा लोकार्पण समारंभ प्रजासत्ताकदिनी आमिर खानच्या हस्ते झाला. ‘सत्यमेव’ची संपूर्ण टीम या वेळी उपस्थित होती. मालिकेच्या 13 भागांच्या डीव्हीडीचे प्रकाशन स्नेहालयातील बालिकांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, ब्रिगेडियर जयदीप भाटिया, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष सुवालाल शिंगवी आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन स्नेहालयात साजरा करणे हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा असल्याचे सांगून आमिर म्हणाला, प्रत्येकाने भारतीय घटनेचे पहिले पान वाचून ते अंत:करणात बिंबवण्याचा व त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे काम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. स्वत:साठी आपण जगतोच, पण इतरांसाठी काही करावे, अशी भावना प्रत्येकाच्या मनात जागायला हवी.

स्त्री भ्रूणहत्येचा संदर्भ देऊन आमिर म्हणाला, भ्रूणहत्या थांबवण्यासाठी प्रत्येक घरात पोलिस नेमता येणार नाही. मला मुलगाच हवा, हा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.

मुलांशी मराठीत संवाद
आमिर खानचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्याला पाहण्यासाठी नगरकरांनी दुतर्फा गर्दी केली होती. स्नेहालयातील सर्व प्रकल्पांची आमिरने आस्थेने पाहणी केली. त्याच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या लहान मुलांशी तो मराठीत बोलला. आपल्या आवडत्या अभिनेत्याशी संवाद साधताना मुलांना प्रचंड आनंद झाला.

‘सत्यमेव’ची फलश्रुती
‘सत्यमेव जयते’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देश-विदेशांतून 2 हजार 975 देणगीदारांनी 3 कोटी 26 लाख 40 हजारांचे अर्थसाहाय्य स्नेहालयाला केले. तेवढाच निधी रिलायन्स फाउंडेशनने देऊ केला. 2 लाख 90 हजार एसएमएस आले. स्नेहालय पाहून प्रभावीत झालेल्या कार्यकर्त्यांनी देशात शंभर ठिकाणी असेच काम सुरू केले आहे...