आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्‍ये विविध सामाजिक विषयांवर युवा निर्माण लघुपट महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ‘सत्यमेव जयते दिवस’ यंदा युवा निर्माण लघुपट महोत्सवाने साजरा करण्याचा निर्णय स्नेहालय परिवाराने घेतला आहे. या माध्यमातून विविध सामाजिक विषय हाताळण्यात येणार आहेत.
सामाजिक बांधिलकी मानणारे अभिनेता आमिर खान यांनी मागील वर्षी ‘सत्यमेव जयते’ मालिकेच्या माध्यमातून अनेक ज्वलंत प्रश्न हाताळले. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच अशी मालिका सादर झाली. या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘सत्यमेव’चा पहिला भाग स्नेहालय संस्थेच्या कामावर आधारित होता.

या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर संपूर्ण देशाचे लक्ष स्नेहालयच्या कामाकडे वळले. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. या ऋणाची ज्योत जागती ठेवण्यासाठी दरवर्षी 1 मे रोजी ‘सत्यमेव जयते दिवस’ साजरा करण्याचा निर्णय स्नेहालयने घेतला आहे. गेल्या वर्षी ‘दुष्काळ आणि मानव देहविक्री - सेवाभावी संस्था, युवक आणि पीडित यांचे कार्य’ या विषयावर देशपातळीवरील दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. सतरा राज्यांतून आलेल्या 165 संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यात सहभाग घेतला.


यावर्षी ‘युवा निर्माण’ हे उद्दिष्ट समोर ठेवून लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या 8 शिबिरांतून दोन हजारांवर युवक-युवती युवा निर्माण व स्नेहालयशी जोडले गेले आहेत. लघुपट महोत्सव 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी असेल. एका लघुपटाचा कालावधी जास्तीत जास्त 15 मिनिटे असेल. त्यासाठी भारतीय स्त्रीसमोरची आव्हाने, बालके आणि मुलांचे प्रश्न, कामाच्या ठिकाणचा भ्रष्टाचार, पर्यावरण - एक जागतिक आव्हान, युवा पिढी आणि सामाजिक बदल असे विषय देण्यात आले आहेत.

महोत्सवाची प्रवेशपत्रिका ऑनलाइन उपलब्ध आहे. 31 मार्चपूर्वी लघुपट संस्थेकडे पाठवायचा आहे. 29 व 30 एप्रिलला लघुपट महोत्सव होईल. सांगता आणि पारितोषिक वितरण 1 मे रोजी स्नेहालय संस्थेत होईल. प्रथम क्रमांकास 20 हजार रुपये आणि दुसर्‍या क्रमांकास 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येक विभागासाठी 5 हजारांचे विशेष ज्युरी पारितोषिक असेल. अधिक माहितीसाठी डॉ. सतीश राजमाचीकर, मानद संचालक, युवा निर्माण, मोबाइल - 9823117434 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सत्यमेव जयते दिवसा’मागचा हेतू

  • ‘सत्यमेव’ने पेटवलेली सामाजिक प्रेरणेची ज्योत तेवत ठेवणे.
  • सेवाभावी संस्थांना एका विषयावर काम करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे.
  • युवा पिढी आणि समाजातील संवेदनशील नागरिकांना सामाजिक बदलासाठी प्रेरित करणे.
  • दरवर्षी एक सामाजिक प्रश्न हाती घेऊन तो सर्वसमावेशक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणे.