आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनामप्रेम नोकरी प्रशिक्षण केंद्र विशेष क्षमतायुक्त मुलांचे भवितव्य घडवेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्नेहालय परिवार समाजातील विविध समस्यांवर रचनात्मक काम करत आहे. अनामप्रेमने अंध, अपंग, मूकबधिर मुला-मुलींच्या पुनर्वसनाचे यशस्वी प्रयोग केले आहेत. बेरोजगार अपंग, मूकबधिर बांधवांचा प्रश्न जिल्ह्यात बिकट आहे. सरकारी यंत्रणा त्यांना रोजगार पुरवण्यास अपुरी असल्यामुळे अशा मुला-मुलींना रोजगारक्षम बनवणे गरजेचे आहे. अनामप्रेमचे यूथ फॉर जॉब सेंटर अपंग, मूकबधिर मुला-मुलींना खासगी कंपन्यांत नोकरी मिळवून देत आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनेल, असा विश्वास एल आणि टी कंपनीचे सह सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी व्यक्त केला.
अनामप्रेमच्या यूथ फॉर जॉब या नोकरी प्रशिक्षण केंद्राच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात पारगावकर बोलत होते. त्यांच्या हस्ते ३५ प्रशिक्षित अपंग, मूकबधिर मुला-मुलींना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमास नंदकुमार कोंबळे उपस्थित होते. कोंबळे यांनी अपंग, मूकबधिर बांधवाना जगण्याचा आत्मविश्वास दिला. या कार्यक्रमास डॉ. अनघा पारगावकर, सुनील माणकेश्वर उपस्थित होते.

स्नेहालयच्या प्रयत्नांतून अनामप्रेमने निबळक येथे बेरोजगार अपंग, मूकबधिर मुला-मुलींसाठी नोकरी प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. मेपासून दर दोन महिन्यांकरिता ३५ जणांचा वर्ग चालवला जातो. आतापर्यंत या केंद्रातून ६० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात लाईफ स्कील, संगणक कौशल्य, इंग्रजी संभाषण आदी विषय असतात.अध्यक्ष अजित माने यांनी अनामप्रेम कशाप्रकारे भविष्यात या बेरोजगार मुला-मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल, याची माहिती दिली. अपंग, मूकबधिर मुला-मुलीच्या जीवनात संस्था परिवाराचे महत्त्व स्नेहालयाचे पालक मिलिंद कुलकर्णी यांनी विशद केले. प्रास्ताविक यूथ फॉर जॉब सेंटरचे संचालक बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केले. पुढील महिन्यांत नव्या स्वरुपात हे केंद्र अधिक गरजू मुला-मुलींना सेवा शिक्षण देईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन तुळशीराम जाधव, विनय सूर्यवंशी, रामदास गायकवाड ज्ञानेश्वर गडाख यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...