आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस युवकांत धुमश्चक्री, घोडेगावात कडकडीत बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वाहनांवर कारवाई करताना पोलिसांनी महापुरुषांची विटंबना केल्याचा आरोप करत युवकांनी बुधवारी पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनीही लाठीमार करत प्रत्युत्तर दिले. ही धुमश्चक्री रात्री पावणेनऊच्या सुमारास नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. संतप्त युवकांनी सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मारहाण करून पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. नंतर जमावाने सुमारे दोन तास नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सपोनि सानप यांच्यासह पोलिसांवर अॅट्रॉसिटी गुन्हा नोंदवून त्यांच्या बदलीची मागणी जमावाने केली. पोलिसांच्या निषेधार्थ गुरुवारी गावात बंद पाळण्यात आला.

बुधवारी सायंकाळी सहायक निरीक्षक सचिन सानप, पोलिस कर्मचारी संदीप घोडके त्यांचे सहकारी घोडेगावात गस्त घालत होते. सेंट अॅनिज हॉस्पिटलशेजारी एका प्रार्थनास्थळासमोर बसलेल्या काही युवकांना सानप यांनी हटकले. युवकांच्या वाहनांच्या नंबरप्लेटवरून पोलिसांनी हुज्जत घातली. पोलिसांनी लाठीमार करून नंबरप्लेट तोडल्याचा आरोप युवकांनी केला. या तोडफोडीत नंबरप्लेटवर असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना झाली. त्यामुळे चिडलेल्या युवकांनी सानप सहकाऱ्यांवर हल्ला चढवला. पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी तेथून पळ काढला.

नंतर सुमारे ६० ते ७० युवकांचा जमाव घोडेगाव बसस्थानकावर जमला. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सहायक निरीक्षक सानप तेथे आले असता युवकांनी त्यांना पुन्हा मारहाण केली. या प्रकारानंतर परिसरातील व्यावसायिकांनी पटापट आपली दुकाने बंद केली. दरम्यान, या घटनेची माहिती समजल्यानंतर शेवगावचे पोलिस उपअधीक्षक दत्तात्रेय कांबळे तत्काळ तेथे आले, परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सानप यांच्यासह इतर पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या सूचनेवरून अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख, श्रीरामपूरचे अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव, नेवाशाचे निरीक्षक अनिल लंभाते, शिंगणापूरचे सहायक निरीक्षक प्रशांत मंडले, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासह स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दलाचे जवान, वज्र वाहनासह मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. तोपर्यंत पोलिस उपअधीक्षक कांबळे यांनी आंदोलकांची समजूत काढल्यामुळे रास्ता रोको मागे घेण्यात आला. वरिष्ठ अधिकारी येण्यापूर्वीच वाहतूक सुरळीत झाली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. तोपर्यंत संतप्त आंदोलक सोनई पोलिस ठाण्यात सपोनि सानप यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यासाठी गेले. उपअधीक्षक कांबळे यांनी त्यांची समजूत घालत शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेचे वृत्त समजताच रिपाइंचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड घोडेगावात दाखल झाले. त्यांनीही सोनई पोलिस ठाण्यात जाऊन आंदोलक उपअधीक्षक कांबळे यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशी गाव बंद ठेवण्याचा इशारा देऊन आंदोलक माघारी परतले. गावात रात्रभर बंदोबस्त तैनात होता.

गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वपक्षीय निषेध सभा घेण्यात आली. यावेळी रिपाइंचे प्रदेश सचिव गायकवाड, भाजपचे युवा नेते सचिन देसरडा, माजी पंचायत समिती सभापती दिलीप लोखंडे, रिपाइंचे घोडेगाव शाखाप्रमुख जगन्नाथ लोंढे, रिपाइंच्या भ्रष्टाचार विरोधी सेलचे शाखाध्यक्ष रवी आल्हाट, शरद आल्हाट, प्रसाद लोंढे, संतोष लोंढे, नेवासे येथील रिपाइंचे संजय सुखदास, राजेंद्र साठे, विलास चक्रनारायण, योसेफ लोंढे, प्रशांत लोंढे यांच्यासह सुमारे दोनशे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या घटनेबाबत गुरुवारी सायंकाळपर्यंत सोनई पोलिस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

सपोनि सानप यांच्या कार्यपद्धतीवर टीका
वाहनांच्यानंबर प्लेटवर कारवाई करण्यासाठी गेलेले सानप टीकेचे धनी ठरले. नंबरप्लेट तोडून महापुरुषांची विटंबना केल्याचा आरोप करत युवकांनी त्यांना मारहाण केली. इतर पोलिसांना हातही लावला नाही. गुरुवारी सकाळी निषेध सभेतही सानप यांच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वांनी टीका केली. दलित समाजाविरुद्ध सानप आकसापोटी कारवाई करत असल्याचा आरोपही करण्यात आला. सानप यांनी युवकांना मारहाण करण्याची गरज नसल्याचे वक्त्यांनी सांगितले.