आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yugandhara Youth Foundation And Burgher Foundation,latest News In Divya Marathi

नागरिकांच्या प्रश्नांमुळे उडाली उमेदवारांची भंबेरी, शहरातील उमेदवार एकाच व्यासपीठावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युगंधर युवा प्रतिष्ठान व सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानतर्फे शहरातील उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले. शहरातील विकासाबद्दल उमेदवारांची भूमिका यावेळी जाणून घेण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे उमेदवारांची भंबेरी उडाली. मात्र, विकासाशी बांधील राहण्याचे आश्वासन सर्व उमेदवारांनी दिले. सर्व उमेदवार एकाच व्यासपीठावर या उपक्रमात काँग्रेसचे सत्यजित तांबे व भाजपचे अभय आगरकर हे दोन उमेदवार सहभागी झाले, तर राष्ट्रवादीतर्फे जिल्हा प्रवक्ता अरविंद शिंदे व शिवसेनेतर्फे सचिन जाधव, तर मनसेच्या वतीने नितीन भुतारे हे प्रतिनिधी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी उपस्थित होते. या उपक्रमात सुमारे पाचशे नागरिक सहभागी झाले. सर्वांनीच या उपक्रमाबद्दल युगंधर युवा प्रतिष्ठान व सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे आभार मानले. तांबे यांनी आपल्या भविष्यातील शहर विकासाच्या योजना सांगितल्या. नवीन पाणी योजना, भूमिगत गटार योजना, उड्डाणपूल, रस्त्यांचे रुंदीकरण, वळणरस्ता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिली.

आगरकर यांनीही त्यांच्या शहर विकासाबाबतच्या कल्पना स्पष्ट केल्या. ते म्हणाले, राज्यात आमचीच सत्ता येणार आहे. याआधी आमच्याच काळात शहरातील विकासाची कामे झाली. त्यामुळे शहराचा विकास आम्हीच करणार आहोत.
प्रास्ताविक प्रदीप ढाकणे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. सुरुवातीला प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना व पक्षातर्फे आलेल्या प्रतिनिधींना विकासाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला. उमेदवारांनी विकासात्मक मुद्यांवर आपापली भूमिका सांगितली. त्यानंतर नागरिकांनी उमेदवारांना प्रश्न विचारले. राजकुमार मुनोत यांनी शहरातील भूमिगत वीजपुरवठा योजनेच्या अधोगतीबाबत विचारताच उमेदवारांनी टोलवाटोलवी सुरू केली. शहरातील रस्त्यांचा विकास होत नाही, अतिक्रमणांमुळे शहराचा विकास मंदावला आहे, ५ टक्के अतिक्रमणधारकांमुळे ९५ टक्के शहरवासीय वेठीला धरले आहेत, नगरच्या औद्योगिक क्षेत्रात नवीन कंपन्या यायला तयार नाहीत, काविळीच्या साथीला जबाबदार कोण, या व इतर मुद्यांवर नागरिकांनी उमेदवारांना धारेवर धरले. नागरिकांनी निवडणूक झाल्यावर होणाऱ्या आमदाराला व खासदारालाही येथे बोलावण्याची मागणी केली. सूत्रसंचालन दीपक शर्मा यांनी केले.

मुलाखती मोहन भोंबे यांनी घेतल्या, तर आभार प्रमोद मोहोळे यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्विततेसाठी राहुल रासकर, सचिन आंबेडकर, प्रणाली पवळ, आरती गायकवाड आदी सदस्य प्रयत्नशील होते.