आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जागांसाठी २८ ला पोटनिवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद ही विधानसभेची पहिली पायरी मानली जाते, त्यानुसार ही पायली चढून जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी विधानसभेत पाऊल ठेवले. त्यामुळे रिक्त झालेल्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी २८ जानेवारीला मतदान होणार असून ३० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

राज्यात नवनिर्मित ठाणे व पालघर या दोन जिल्हा परिषदांसह त्याअंतर्गत असलेल्या १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याबरोबरच इतर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात नगर जिल्हा परिषदेच्या तीन जागांचा समावेश आहे.

राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका तीन महिन्यांपूर्वीच झाल्या, या निवडणुकीत अकोले तालुक्यातील राजूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य वैभव पिचड, पाथर्डी तालुक्यातील सदस्य मोनिका राजळे, श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव गटाचे सदस्य राहुल जगताप यांनी विधानसभेत नशीब आजमावले. त्यात त्यांना यश मिळून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यामुळे या तीनही गटांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने ५ जानेवारीला रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी केली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव गटासाठी हेमंत नलगे, बाळासाहेब जगताप, संतोष लगड, दिनकर पंधरकर, विश्वास थोरात, जिजाराम खामकर, कल्याण जगताप, रामदास झेंडे आदींची नावे चर्चेत आहेत. अकोले तालुक्यातील राजूर गटासाठी भरत घाणे, राजू कानकाटे, यशवंत अबाळे, दिलीप भांगरे, अशोक भांगरे आदी नावे चर्चेत आहे, तर पाथर्डी तालुक्यातील मिरी गटासाठी (महिला) संगीता कोरडे यांच्यासह सिंधू पालवे, उषा कराळे, अकोलकर यांची नावे चर्चेत आहेत. या नावांची चर्चा असली, तरी यापैकी किती जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, हे सध्या तरी स्पष्ट झाले नाही. एकूणच निवडणुकीत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पोटनिवडणुकीसंदर्भात ८ जानेवारीला बैठक होण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना तसेच काँग्रेसने देखील पोटनिवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. २८ जानेवारीला मतदान झाल्यानंतर ३० ला मतमोजणी होणार आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
८ ते १३ जानेवारी अर्ज दाखल करता येणार. १४ जानेवारी छाननी व पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. १७ जानेवारीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपील करता येईल. सुनावणीनंतर २१ जानेवारीला पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. १९ जानेवारीला अर्ज माघारी. २३ जानेवारीला मतदान केंद्रांची यादी जाहीर केल्यानंतर २८ जानेवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी ३० जानेवारीला होणार आहे.