आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांच्या विक्रीतून 7 कोटींची उलाढाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या पारनेर तालुक्यातील गोरेगावकरांना यावर्षी फूलशेतीने मोठा आधार दिला. गणेशोत्सव ते दिवाळी या केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत फुलांच्या विक्रीतून गावांत सुमारे सात कोटींची उलाढाल झाली. त्यामुळे गोरेगावची फुलांचा गाव अशी ओळख झाली आहे.

गोरेगाव हे दुष्काळी गाव आहे. येथील शेती पावसावरच अवलंबून असते. रोजगार हमी योजनेच्या कामांवरील राज्यातील सर्वाधिक मजुरांचे गाव असल्याची गोरेगावची नोंद आहे. गोरेगावातील जमीन फूलशेतीला पोषक असल्याने अनेक वर्षांपासून येथे विविध फुलांचे उत्पादक घेतले जाते. उन्हाळ्यात फुलांच्या रोपांची लागवड केली जाते. शेवंतीच्या ‘राजा’ जातीची लागवड मार्च ते एप्रिल महिन्यात, तर झेंडू, अष्टर, गलंडा, टाकळ या फुलझाडांची लागवड जुलैमध्ये केली जाते. दुष्काळात शेवंतीची लागवड करून शेतकर्‍यांनी ही रोपे टँकरच्या पाण्यावर जगवली. शेवंतीच्या फुलांची तोडणी नवरात्रीपासून सुरू होत असली, तरी इतर जातीच्या फुलांची तोडणी गणेशोत्सवापासूनच करण्यात येते. गोरेगावात प्रत्येक शेतकरी फुलांची लागवड करतो. दुष्काळी परिस्थितीतही यावर्षी 50 एकरांवर फूलझाडांची लागवड करण्यात आली होती.

गणेशोत्सवात झेंडू, अष्टर, टाकळ या फुलांना प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपये भाव मिळाला. नवरात्रीत शेवंतीला शंभर व दिवाळीत 50 ते 80 रुपये भाव मिळाला. येथील फुलांना परराज्यातही चांगली मागणी असल्याने मुंबईचे व्यापारी गोरेगावात येऊन फुलांची खरेदी करतात. नगर, कल्याण येथेही शेतकरी फुले पाठवतात. यावर्षी फूलशेतीमुळे अनेक शेतकरी लखपती झाले. दोन महिन्यांत फुलांच्या विक्रीतून सात कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाने गावात विकासकामे झाली. त्यामुळे गावाने ग्रामविकासात वेगळा ठसा उमटवला आहे.

चांगले उत्पन्न मिळाले
सलग दोन वर्षे पडलेल्या दुष्काळाने शेती व्यवसाय मोडीत निघाला होता. मात्र, या हंगामात फुलांच्या विक्रीतून बर्‍यापैकी पैसे पदरात पडले असून फुङभगभगभलांनीच आधार दिला.’’ दादाभाऊ नरसाळे, शेतकरी.

उत्पादन वाढणार
गोरेगावकरांनी दुष्काळातही फूलशेती जगवली. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिमेंट बंधारे तुडुंब भरले आहेत. पाण्याची पातळीही वर आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी फूलशेतीचे उत्पादन वाढेल. ’’ विठ्ठल काकडे, शेतकरी.

अर्थकारण फुलांवरच
शेती व्यवसाय अशाश्वत आहे. फुलांना चांगला बाजारभाव मिळाला, तरच शेतकर्‍यांना नगदी पैसा मिळतो. शेतकर्‍यांचे वर्षभराचे आर्थिक गणित फूलशेतीवर अवलंबून आहे. ’’ संतोष तुळशीराम नरसाळे, गोरेगाव, शेतकरी.