आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zilha Parishad Member Not Allowed To Chief Minister Meeting

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जि. प. सदस्यांना ‘नो एन्ट्री’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अवघ्या पाऊण तासात केवळ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरुवारी टंचाईचा धावता आढावा घेतला. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकार्‍यांना बैठकीत प्रवेश नव्हता.

नियोजन भवनात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री बबनराव पाचपुते, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, महापौर शीला शिंदे, आमदार अनिल राठोड व विजय औटी, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार आदी उपस्थित होते.

चव्हाण यांनी जिल्ह्यातील टंचाई उपाययोजनांची माहिती घेतली. कितीही गंभीर स्थिती निर्माण झाली, तरी शेतकरी व जनतेच्यामागे शासन खंबीरपणे उभे असून निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकार्‍यांच्या संपर्कात आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. असे असतानाही गुरुवारी पुन्हा अधिकार्‍यांच्याच उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

काही दिवसांपूर्वी पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींना बैठकीत प्रवेश देण्यात आला होता. लोकप्रतिनिधींनी समस्यांचा पाढाच वाचल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची चांगलीच अडचण झाली होती. जिल्हा प्रशासनाचा कारभार थेट मुख्यमंत्र्यांसमोर उघडा पडू नये याची खबरदारी गुरुवारी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत प्रशासनाने घेतल्याचे यानिमित्ताने समोर आले. आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे तथा नियोजन मंडळाचे सदस्य आले होते. परंतु प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला. ऐनवेळी केवळ आमदार व खासदारांना प्रवेश देण्यात आला. या प्रकारामुळे नाराज झालेल्या लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. टंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांचा गोलगोल आलेख प्रशासनाने दाखवला. केवळ पाठ थोपटून घेण्यासाठीच प्रशासनाने आम्हाला जाणीवपूर्वक बैठकीपासून दूर ठेवल्याचा आरोप काही लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना केला.


पालकमंत्री बबनराव पाचपुते यांची काँग्रेसवर कुरघोडी
दुष्काळी उपाययोजना राबवण्यात पालकमंत्री बबनराव पाचपुते पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या जिल्ह्यातील मंत्र्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी केला होता. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा आयोजित करण्याची खेळी जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र, गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी केवळ अधिकारी व मंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या धावत्या आढावा बैठकीमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनसुबे उधळले गेले. दुपारी पाऊण ते अडीचचा वेळ या बैठकीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बैठक पावणेदोन ते अडीच अशी केवळ पाऊण तास चालली. त्यातही सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रशासनावरील रोष व दुष्काळी उपाययोजनांमध्ये डावलले जात असल्याचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीतून जिल्ह्यासाठी कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे दुष्काळी जनतेसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे शिर्डी ते त्र्यंबकेश्वर देवदर्शनामधील बैठकीचा फार्स ठरला.

बैठकीनंतरची पत्रकार परिषदही आटोपती घेण्यास पालकमंत्री पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत कुरघोडी करण्यात पाचपुते यशस्वी ठरल्याचे कबुली खुद्द काँग्रेसचेच जिल्ह्यातील पदाधिकारी देत आहेत.


..अन् पत्रकार भडकले
बैठकीच्या वार्तांकनासाठी इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांचे पत्रकार जिल्हा नियोजन भवनात गेले असता तेथे तैनात पोलिसांनी वरच्या साहेबांचा आदेश असल्याचे सांगून प्रवेश नाकारला. त्यामुळे पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. बैठकीनंतर मुख्यमंत्री कॉन्फरन्स हॉलमध्ये भेटणार असल्याचे नंतर अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत थांबले. परंतु जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी मुख्यमंत्री बाहेरच बोलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पत्रकार भडकले. अखेर चव्हाण यांना पत्रकारांशी कॉन्फरन्स हॉलमध्ये येऊनच संवाद साधावा लागला.


काडीचाही फायदा नाही
जिल्ह्यातील दुष्काळाची विदारकता प्रशासनाने समोर येऊ दिली नाही. प्रवेश नाकारल्याबद्दल आम्ही मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा निर्णय प्रशासनाचा असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे मुख्यमंत्री जिल्ह्यात येऊन काडीचाही फायदा झाला नाही. फक्त प्रशासनाला त्यांची पाठ थोपटून घेता आली. बाळासाहेब हराळ, जि. प. सदस्य, काँग्रेस.


हा तर जनतेचा अपमान
जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना जनतेच्या भावना पोहोचवण्याचे काम आमचे आहे. बैठकीत प्रवेश नाकारला हा आमचाच नाही, तर सर्व जनतेचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी असे करणे चुकीचे आहे.’’ बाबासाहेब तांबे, सभापती, कृषी समिती.