नगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मागील निवडीत राष्ट्रवादीने काँग्रेसला धक्का देत भाजप व शिवसेनेला बरोबर घेतले होते. ती सल अजून कायम असल्याने ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची जिरवण्यासाठी भाजप व शिवसेनेला बरोबर घेणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तथापि, दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याचा इन्कार करत आमचे मनोमिलन झाल्याचा दावा केला आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळावर लढवली होती. काँग्रेसला २८, तर राष्ट्रवादीला ३२ जागांवर विजय मिळाला. भाजप ६, शिवसेनेला ६, कम्युनिस्ट १ तर अपक्ष २ असे बलाबल आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याचे ठरवले होते, परंतु राष्ट्रवादीने निवडीच्या सभेपूर्वी काँग्रेसला अंधारात ठेवून भाजप व शिवसेनेला विश्वासात घेतले. राष्ट्रवादीने अध्यक्षपद व उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या लक्षात हा डाव आला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यावेळी अध्यक्षपदी विठ्ठल लंघे व उपाध्यक्षपदी मोनिका राजळे यांची निवड झाली. राष्ट्रवादीने अध्यक्ष व उपाध्यक्षपद स्वत:कडे ठेवून दोन समित्या भाजप व शिवसेनेला दिल्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले. ही सल अजूनही काँग्रेसचे सदस्य व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. लोकसभेपूर्वीच जिल्हा परिषदेत दुरुस्ती करून भाजप व शिवसेनेला राष्ट्रवादीने बाजूला करावे, असा आग्रह काँग्रेसने धरला होता, पण त्यावेळी राष्ट्रवादीने राज्यातील इतर जिल्हा परिषदांकडे बोट करून आधी तेथे दुरुस्ती करा, मग आम्ही करू, असा हेका धरला होता. काँग्रेसला तब्बल अडीच वर्षे विरोधात बसावे लागले.
अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर आता राष्ट्रवादीला विधानसभेपूर्वी शहाणपण सुचले असून त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही झाले-गेले विसरून २१ सप्टेंबरला होणाऱ्या निवडीत आघाडी करण्यासाठी तयारी दर्शवली. यासंदर्भात मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मधुकर पिचड यांनी जिल्हा परिषदेत आघाडी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असा फॉर्म्युलाही ठरला आहे. परंतु निवडीच्या वेळी काँग्रेसने इतर सदस्यांना बरोबर घेऊन संख्याबळ वाढवल्यास अध्यक्षपदावरही काँग्रेस दावा करू शकते, पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. सत्ता स्थापन करताना बहुमतासाठी किमान ३८ संख्याबळ होणे अपेक्षित आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आघाडी होऊनच सत्ता स्थापन होणार आहे.
अध्यक्षपद महिलेसाठी (नामप्र)
राखीव असून राष्ट्रवादीत या पदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
काँग्रेसमध्येही उपाध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. विखे व थोरात गटापैकी कोणत्या गटाकडे उपाध्यक्षपद जाते व समित्या कुणाच्या पदरात पडणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गुंड, लामखेडंमध्ये चुरस
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने या पदासाठी अश्विनी भालदंड, कालिंदी लामखेडे, जयश्री दरेकर, नंदा भुसे, मंजूषा गुंड यांची नावे आघाडीवर आहेत. या निवडी होत असताना गुंड व लामखेडे यांच्यात चुरस वाढली असून दोन्ही नावे जोरदार चर्चेत आहेत. त्यानुसार पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष निवडीच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होईल.
पाटील व पांडुळे चर्चेत
ज्यांच्या जास्त जागा त्यांचा अध्यक्ष व त्याखालोखाल असलेल्या जागेला उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून ज्येष्ठ सदस्य अॅड. सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ, अण्णासाहेब शेलार, परमवीर पांडुळे यांची नावे चर्चेत आहेत. हराळ यांनी सध्यातरी मौन पाळले आहे. विखे व थोरात या दोन गटांपैकी उपाध्यक्षपद कोणत्या गटाकडे जाईल, याची उत्सुकता वाढली आहे.