आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची चाचपणी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकींचा बिगूल वाजण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. त्यापूर्वीच राजकीय धुरंधरांनी गट गणांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली अाहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुका प्रमुख पक्षांकडून स्वबळावरच लढवल्या जाण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या राजकारणावर स्वत:चा ठसा असलेल्या नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे गल्लीपासून दिल्लीवाल्यांचे लक्ष असते. कुरघोडीचे राजकारण करण्यात पटाईत असलेले मातब्बरही याच जिल्ह्यातील असल्याने आतापासून रणनिती आखायला सुरुवात झाली आहे.

मागील वेळी जिल्हा परिषदेचे ७५ गट १५० गणांत निवडणुकीचा आखाडा रंगला होता. ही निवडणूक २००१ च्या जनगणनेनुसारच झाली. आगामी (२०१७) निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होत आहे. कर्जत, अकोले, पारनेर नगरपंचायतीची स्थापना झाली आहे, तसेच शेवगाव आणि जामखेड नगरपरिषदेच्या निर्मितीमुळे गटरचनेत बदल होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ७३ गट १४६ गण असतील.

विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २० मार्चला संपणार आहे. त्यापूर्वी दीड ते दोन महिने अगोदर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. जानेवारीत निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत सध्या (निकालानुसार) राष्ट्रवादीचे ३०, काँग्रेस २८, शिवसेना ६, भाजप ७, अपक्ष आणि कम्युनिस्ट असे पक्षीय बलाबल आहे. पण लोकसभा विधानसभा निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे राजकीय चलबिचल वाढली आहे. राज्यात केंद्रात भाजप शिवसेना सत्तेत असताना जिल्हा परिषदेचा गड राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपचीही ताकद वाढल्याने भाजपकडूनही सत्तेचा दावा केला जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव अाहे. स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी पक्षपातळीवर सुरू आहे. विद्यमान सदस्यदेखील पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत अाहेत. पण रचनेत बदल होत असतानाच आरक्षण कोणते येणार यावर त्यांची रणनिती ठरणार आहे. सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुका स्वबळावर होणार की, आघाडी युती करून याबाबत श्रेष्ठींकडे बोट दाखवले जात आहे. परंतु राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा स्वबळावरच निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा निवडणूक विभागाने दोन दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्तांकडे गट गणरचनेचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी आल्यानंतर पुढील प्रक्रियेला गती येईल.
सत्तांतर होईल
ज्या पद्धतीने केंद्रात, राज्यात सत्तांतर झाले, तसेच सत्तांतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही होणार आहे. त्यादृष्टीने आमची जोरदार तयारी सुरू आहे. चांगल्या स्वच्छ प्रतिमेच्या नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीत आम्ही संधी देणार आहोत. शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

२३ सप्टेंबरनंतर सोडत
जिल्हापरिषद गट गण रचनेसंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला २३ सप्टेंबरपर्यंत मंजुरी मिळू शकते. त्यानंतर आरक्षण सोडती काढल्या जातील. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रचाराला गती येईल.
आम्हाला पुन्हा संधी
भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्याविरोधात मोठा असंतोष पसरला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निश्चित आम्हाला पुन्हा संधी आहे. स्वबळ किंवा आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पण स्वबळावरही आमची ताकद निश्चितच वाढणार आहे.’’ चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

भाजप एक नंबर राहील
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पक्ष नंबर एकचा पक्ष ठरणार आहे. केंद्र राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणुका स्वबळावर झाल्या, तरी भाजपच सत्तेत असेल. पण आमची सर्व मित्रपक्षांना बरोबर घेण्याची तयारी असेल. प्रा.भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप.
बातम्या आणखी आहेत...