आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडेच राहणार : प्रा. भानुदास बेरड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीतील यशानंतर पक्षात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळून पक्षाकडेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राहील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी व्यक्त केला.
प्रा.बेरड यांनी दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल चर्चा केली. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत मिळालेले यश कोणा एकट्याचे नव्हे, तर सर्वांचे यश आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका हेच आता आपले लक्ष्य राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पुढील आठवड्यापासून तालुकास्तरावर गटनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकीची चाचपणी करण्यात येणार आहे. इच्छुकांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीतील यशानंतर पक्षात चांगले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत यशाची अपेक्षा होती. मात्र, यश मिळण्याची काही वेगवेगळी कारणे आहेत. उर्वरित ठिकाणी पक्षाला मिळालेल्या यशामुळे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणूक आपणच जिंकू, असा विश्वास आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे भाजपकडेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर त्याचाही सकारात्मक परिणाम नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसून आला. नोटबंदीचा हा निर्णय जनतेला आवडला आहे. सर्वसामान्य माणूस या निर्णयाचे स्वागत करत आहे, मात्र जे काळे पैसे बाळगून आहेत, त्यांना हा निर्णय अावडलेला नाही. या नव्या बदलाचा पक्षाला फायदा होईल. पक्षात गटतट राहिले नाहीत. पक्ष एक संघ असल्यामुळेच नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळू शकले, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते सूर्यभान वहाडणे यांच्यामुळेच मी भाजपमध्ये
भाजपचेमाजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांच्यामुळेच मी भाजपत आलो. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्यामुळेच घडले. केंद्र राज्य सरकारने जे चांगले निर्णय घेतले आहेत, त्याची माहिती पक्षाच्या जनसुराज्य पर्वाच्या माध्यमातून गावपातळीवर पोहोचवण्याचे काम आता हाती घेण्यात येणार आहे, असे प्रा. बेरड म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...