आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. शिक्षण समिती घेणार आंतरजिल्हा बदलीचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षकांच्या बिंदुनामावलीला विभागीय आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर प्राधान्याने आंतरजिल्हा बदल्या करायच्या की पदोन्नती करायची हा निर्णय शिक्षण समिती घेणार आहे. सोमवारी (२८ जून) बिंदुनामावली तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण समितीच्या आगामी सभेकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

मुळचे नगर जिल्ह्यातील शिक्षक तसेच पत्नी एकत्रिकरणासाठी नगरमध्ये येण्यास इच्छूक असलेल्या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केले आहे. या प्रस्तावाचा आकडा हजार ८०० वर पोहोचला आहे. अनेक वर्षांपासून या शिक्षकांनी नगरमध्ये बदलून येण्याची मागणी केली. परंतु, वारंवार तांत्रिक कारणे तसेच शासनाचे आदेश झाल्याने या बदल्या लांबणीवर पडल्या आहेत.

सात वर्षांपासून आपसी वगळता एकही एकतर्फी शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली नाही. मागील वर्षी जिल्हा परिषदेने २०७ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी सशर्त नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. त्याचवेळी २०१० मधील सीईटीधारक पात्र असलेल्या ३१० उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. जागाच रिक्त नसल्याने २०७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या पुन्हा प्रलंबित राहिल्या. २०१५-२०१६ च्या संच निश्चितीनुसार जिल्ह्यात १२७ जागा रिक्त दाखवण्यात आल्या आहेत. या जागांवर प्राधान्याने बदल्या कराव्यात या मागणीसाठी शिक्षकांनी उपोषण केले. रोस्टर मंजुरीसाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली. सर्वसाधारण सभेतही सर्वच सदस्यांनी या बदल्या करण्याची आग्रही मागणी लावून धरली. सोमवारी बिंदुनामावली विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर आतंरजिल्हा बदल्या करायच्या की मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक पदोन्नती करायची याचा निर्णय होणार आहे. सभेतच बदल्यांबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले. पण अगोदर पदोन्नती करायची की बदल्या करायच्या हा निर्णय शिक्षण समितीने निर्णय घ्यावा असेही बिनवडे यांनी स्पष्ट केले.

सकारात्मक निर्णय
रखडलेल्या आंतरजिल्हा बदल्या करण्याची आमची प्रामाणिक भूमिका आहे. त्यानुसार प्रसासन पदाधिकारीही सकारात्मक आहेत. बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर शिक्षण समितीच्या सभेत आंतरजिल्हा बदल्यांबाबत निर्णय घेतला जाईल. अण्णा शेलार, उपाध्यक्ष शिक्षण समिती सभापती, जिल्हा परिषद
बातम्या आणखी आहेत...