आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतुष्ट जिल्हा परिषद सदस्य पदाधिकार्‍यांना धारेवर धरणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-सेनेला हाताशी धरून सत्तेत आहे. मात्र, सभापती व गटनेत्यांकडून युतीच्याच सदस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सेसचा निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे युतीच्या असंतुष्टांची फौज पुढील काळात पदाधिकार्‍यांना धारेवर धरणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गहिनीनाथ शिरसाठ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

विषय समित्यांच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीने युतीच्या मदतीने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर आघाडीची बतावणी करून कात्रजचा घाट दाखवला होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीने युतीबरोबर तडजोड करून शब्द दिला होता. त्यानुसार सेना-भाजपला सभापतिपद दिले.

शिरसाठ म्हणाले, राष्ट्रवादी व युतीची सत्ता स्थापन होऊन दीड वर्ष होऊनही दुर्लक्ष होत असल्याची भावना युतीच्या सदस्यांमध्ये धुमसत आहे. भाजपच्या हर्षदा काकडे (सभापती), बाजीराव गवारे (गटनेते) उज्ज्वला शिरसाठ, मंदा गायकवाड, अशोक आहुजा, अंजली काकडे, तर शिवसेनेचे बाबासाहेब तांबे (सभापती), मंदा भोसले, सुरेखा शेळके, छाया बर्डे, शारदा भिंगारदिवे, दत्तात्रेय सदाफुले हे सदस्य आहेत. सभापती व गटनेत्यांकडून सदस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने सदस्यांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. याला बाबासाहेब गायकवाड यांनी दुजोरा देत भाजप व सेनेच्या पदाधिकार्‍यांवर सदस्य नाराज असल्याचे स्पष्ट केले.

सेनेचे सदस्य दत्तात्रेय सदाफुले म्हणाले, गटनेते व सभापतींची कामे मार्गी लागत आहेत. मात्र, सदस्यांची कोणतीही कामे होत नाहीत. दलित वस्ती व बंधार्‍यांची कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभेपूर्वी असंतुष्ट सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. गरज भासल्यास र्शेष्ठींकडेही तक्रार करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे.


कुणाचीही तक्रार नाही
शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याने आतापर्यंत माझ्याकडे तक्रार अथवा नाराजी व्यक्त केलेली नाही. जास्तीत जास्त चांगले काम करण्यावर माझा भर असतो. कुणाची नाराजी असेल, तर त्यांनी ती माझ्यासमोर मांडावी. ती दूर करण्यासाठी सभापती या नात्याने प्रयत्न करू.’’ बाबासाहेब तांबे, सभापती (शिवसेना).

दुजाभाव केला नाही
भाजपच्या सदस्यांनी आतापर्यंत मला जी कामे सांगितली, ज्या अडचणी मांडल्या त्या मी सोडवल्या आहेत. त्या कामांची नोंदही आहे. काम करत असताना कुणाशीही दुजाभाव ठेवण्याचे कोणतेही कारण नाही, जर सदस्यांची नाराजी असेल मला सांगावे.’’ हर्षदा काकडे, सभापती.