आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव राजळे, प्रताप ढाकणे, पालवे, खेडकर सौभाग्यवतींच्या उमेदवारीसाठी आग्रह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. मिरी गटातून माजी आमदार राजीव राजळे यांची, तर भालगाव गटातून प्रताप ढाकणे यांची पत्नी उमेदवारी दाखल करणार असल्याने या दोन्ही गटाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून या दोन्ही गटात राजळे व ढाकणे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पाथर्डी तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट असून चारही गटांचे आरक्षण महिला राखीव आहे. मिरी गटाचे प्रतिनिधीत्व सध्या मोहन पालवे करीत आहेत. शिवसेनेकडून सलग तीनवेळा त्यांनी या गटातून निवडून येत हॅट्ट्रिक केली आहे. दांडग्या जनसंपर्काच्या बळावर या निवडणुकीत ते आपल्या पत्नीला रिंगणात उतरवणार आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार राजीव राजळे हे आपली पत्नी मोनिका यांना रिंगणात उतरवणार आहेत. या मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य असून आमदारकीच्या काळात राजळे यांनी केलेल्या कामांवर त्यांची भिस्त आहे.
जिल्हा परिषदेच्या भालगाव गटातून प्रताप ढाकणे यांची पत्नी प्रभावती निवडणूक लढवणार आहेत. भाजपकडून या गटात तालुकाध्यक्ष सोमनाथ खेडकर हे आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत. प्रत्येक निवडणुकीत ढाकणे यांना या गटातून मताधिक्य मिळाले असल्याने, तसेच या गटात वंजारी समाजाची संख्या अधिक असल्याने ते आपल्या पत्नीसाठी आग्रही आहेत. खेडकर यांनी या गटाचे एकदा प्रतिनिधीत्व केले असून भाजप अंतर्गत राजकारणात ते ढाकणेंचे कट्टर विरोधक मानले जातात. खासदार दिलीप गांधी गट त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. तालुक्याचे राजकारण पूर्वीपासून राजळे व ढाकणे या दोन घराण्यांभोवतीच केंद्रित झाले असल्याने या वेळी त्यांच्याच घरातील महिलांना उमेदवारी मिळणार असल्याने मिरी व भालगाव गटाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.