आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सौ’च्या उमेदवारीसाठी ‘श्री’ची धावपळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समितीचे गण असून पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या पतिराजांनी सौभाग्यवतीच्या उमेदवारीसाठी धावपळ सुरू केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते कामाला लागले असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. सर्वच पक्षातील कार्यकर्ते उमेदवारी नाही मिळाली तरी पक्ष देईल त्याच उमेदवाराचे काम करू, असे छातीठोकपणे सांगत आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची वातावरण निर्मिती गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात सुरू झाली असून त्याचे पहिले रणशिंग राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्याच्या निमित्ताने मंजुरी व घोषणांचा पाऊस पाडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना-भाजप आरपीआय महाआघाडीच्या वतीने माहीजळगावात कैलास शेवाळेंच्या संकल्पपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना आणून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काँग्रेसनेही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच मनसेच्या इंजिनला बंडखोरी तसेच पक्षांतरने ग्रासले असले तरी विधायक कामातून चमक दाखवण्यात ते यशस्वी ठरतील.
जिल्हा परिषदेसाठी कर्जत, मिरजगाव, चापडगाव राशीन व बारडगाव असे पाच गट तर कर्जत, राशीन, मिरजगाव, वाटेगाव, कोरेगाव, कोंभळी, भांबोरा, बारडगाव सुद्रिक, कुळधरण व चापडगाव असे दहा गण आहेत. प्रत्येक पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. चापडगाव गटात भाजपाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कैलास शेवाळे पुन्हा नशीब आजमावत असून गेल्यावेळी त्यांच्या पत्नी जयश्री शेवाळे यांना काँग्रेसच्या मोहिनी प्रवीण घुले यांनी पराभूत केले होते. यावेळी राष्ट्रवादीकडून सभापती नानासाहेब निकत, काँग्रेसच्या वतीने अशोक खेडकर, प्रवीण घुले, किरण पाटील, अ‍ॅड. माणिकराव मोरे ही नावे आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे पाटेगाव गणासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय शेटे, प्रा. किरण पाटील, भाजपाचे विद्यमान सदस्य राम शेटे, डॉ. पुराणे दिगांबर, अमरजीत खेडकर ही नावे आघाडीवर आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास हाके हे सुद्धा पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत. कर्जत जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसकडून विद्यमान सदस्य अंबादास पिसाळ, पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, तर राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, भाजपाकडून उपसरपंच नामदेव राऊत, स्वप्निल देसाई किंवा नवीन चेहरा दिला जाऊ शकतो. शिवसेनेकडून शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बळीराम यादव मनसेकडून जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे ही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.
राशीन गट महिलांसाठी खुला असून येथे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येच लढतीचे चिन्ह असून बापूसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे संभाजीराजे भोसले, पै. विजय मोढळे यांच्या पारंपरिक गटात लढत होईल. मिरजगाव गटात राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, डॉ. पंढरीनाथ गोरे, पप्पू पांडुळे, भाजपातून डॉ. नितीन झरकर, हिगडे, संजय जंजिरे, शिवसेनेकडून गुलाब तनपुरे इच्छुक आहेत.
लक्षवेधी लढत व बहुचर्चित असलेल्या बारडगाव सुद्रिक गटावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यमान सदस्य राजेंद्र गुंड यांनीच या गटावर वर्चस्व राखले आहे. मध्यंतरी त्यांनी कमळातून बाहेर येत राष्ट्रवादीत प्रवेश करीत घड्याळ हातावर बांधले. ही निवडणूक त्यांच्यासाठी अग्निदिव्य ठरणार आहे. त्यातच हा गट महिलांसाठी राखीव असल्याने आजवरचे या गटावरचे वर्चस्व भाजपाचे की गुंडांची व्होट बँक हे या निवडणुकीत सिद्ध होईल. येथे त्यांना त्यांचे परंपरागत विरोधक काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, भाजपाचे शांतीलाल कोपनर यांचा कडवा विरोध राहणार आहे आणि तालुक्यातील सर्वांत अटीतटीच्या व धक्कादायक निकाल देणारी हीच लढत होईल. त्यामुळे या लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.