आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई केल्याने गैरप्रकार थांबले..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकारी व पदाधिकारी ही यंत्रणेची दोन चाके आहेत. या दोन्हींमध्ये समन्वय असल्यास कामे अधिक चांगली होतात. बनावट अपंग प्रकरणात कारवाई केल्याने गैरप्रकार थांबले. प्रशासकीय कामकाजात आरोप-प्रत्यारोप होतात, पण प्रत्येक घडामोडीला दोन बाजू असतात. त्या तपासून काम केल्यास अडचणी येत नाहीत, असे जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

अग्रवाल म्हणाल्या, येथे काम करताना आलेला चांगला अनुभव मला पुढे मिळणार नाही. राज्यात बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करण्याचे प्रकार घडत असतात. जिल्हा परिषदेत बनावट अपंग प्रमाणपत्रे सादर झाल्यानंतर मी तातडीने कारवाई केली. त्यावेळी दबाव होता, पण केवळ न्याय देण्यासाठी तो झुगारला. बनावट शिक्के वापरले म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांनीच गुन्हे दाखल करायला हवे होते. पण त्यांनी न केल्याने जिल्हा परिषदेला पुढे येऊन गुन्हे दाखल करावे लागले.

संगमनेर तालुक्यात बसवलेल्या बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा विषय गाजला. या प्रणालीच्या ठेकेदाराची नियुक्ती आम्ही केली नाही. पैसे तेराव्या वित्त आयोगातून शासनाच्या निर्देशानुसार दिले. पुढील बिले थांबवली. अनेक घोटाळे समोर आले. संबंधितांवर कारवाई करण्यात कसूर केली नाही. नगरमध्ये मिळालेला अनुभव शब्दांत सांगणे कठीण आहे, असे अग्रवाल यांनी नमूद केले.
रुबल अग्रवाल

शैलेश नवल आज पदाची सूत्रे स्वीकारणार
नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवल हे बुधवारी (5 फेब्रुवारी) रूजू होणार आहेत. मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल सकाळी त्यांच्याकडे पदभार सोपवून कार्यमुक्त होतील.