आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीअभावी पाच योजना बंद होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येणार्‍या पाच प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांचे वीजबिल व पाणीपट्टी भरण्यासाठी साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, हा निधी दोन दिवसांपूर्वीच खर्च झाल्याने डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यानंतर या योजना निधीअभावी बंद पडणार आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या जातात. त्यानंतर या योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या जातात. शेवगाव-पाथर्डी ही 54 गावांची पाणी योजना अकरा वर्षांपूर्वीच जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाली होती. तेव्हापासून ही योजना चालवली जात आहे. तसेच बुर्‍हाणनगर (45 गावे), मिरी तिसगाव (22 गावे) या योजना एक वर्षापूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. नव्याने गळनिंब शिरसगाव (18 गावे) चांदा (5 गावे) या योजना काही महिन्यांपासून जिल्हा परिषद चालवत आहे. जिल्हा परिषदेने काही दिवस ही योजना चालवल्यानंतर स्थानिक समितीकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. पण स्थानिक पातळीहून योजना ताब्यात घेतली जात नसल्याने नाईलाजास्तव जिल्हा परिषदेलाच योजना चालवावी लागत आहे. या योजना चालवण्यासाठी वीजबिल व पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी भरावी लागते. त्यासाठी जिल्हा परिषदेने सुमारे साडेचार कोटींची तरतूद केली होती. वेळोवेळी विविध बिलांचा भरणा केल्याने हा निधी शनिवारी (16 नोव्हेंबर) संपला. त्यामुळे पुढील महिन्यांची बिले भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे निधी नाही. त्यामुळे या योजना निधीअभावी डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच बंद पडतील.

पाणीपट्टी भरली तरच योजना सुरू
कोणतीही योजना चालवण्यासाठी निधीची गरज असते. पण जिल्हा परिषदेकडील निधी संपल्याने पुढील काळात योजना चालवणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत पाणीपट्टी भरली, तरच या योजना सुरळीत सुरू राहतील; अन्यथा योजना बंद होणे अटळ आहे.’’ शिवशंकर निकम, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा.