आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतुष्टांकडून फटका बसण्याची शक्यता, समिती मिळवण्यासाठी लामखडे गटाची व्यूहरचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत शह-काटशहाचे राजकारण झाले. उपाध्यक्षपदी काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार यांना संधी देऊन श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांचा विधानसभेचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न झाला. जगताप काँग्रेसमध्ये असले, तरी राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट देऊन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना नामोहरम करण्याचा डाव टाकला गेला. मात्र, या सर्व खेळीत राष्ट्रवादाबरोबर काँग्रेसची फरफट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच जिल्हा परिषदेत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी केली गेली. उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आल्याने या जागेवर शेलार यांची बिनविरोध निवड झाली. आघाडी झाल्यास श्रीगोंदे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे, पण उमेदवार निश्चित नाही. विधानसभेला शेलारांचा अडसर होऊ नये, यासाठी त्यांना उपाध्यक्षपद दिले गेले. त्यामुळे राहुल जगताप यांचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीत या खेळीचा थेट फायदा झालाच, तर तो राष्ट्रवादीला होणार आहे. त्यामुळे हे पद मिळवूनही काँग्रेसने काय साध्य केले, असा सवाल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.
सारे काही राष्ट्रवादीच्या पथ्यावर असल्याचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ हे इच्छुक होते. पण राष्ट्रवादीचा फायदा होत असताना शेलारांनाच उपाध्यक्षपद का, हा प्रश्न काँग्रेसमधील नाराजांमध्ये धुमसत आहे. याचा फटका निवडणुकीत आघाडीला बसू शकतो. विषय समित्यांपैकी अर्थ व बांधकाम समिती मिळावी, असा काँग्रेसचा आग्रह आहे. तथापि, राष्ट्रवादीने या समितीवर दावा केला असल्याने आपण राष्ट्रवादीबरोबर फरफटत चाललो असल्याची भावनाही काँग्रेस इच्छुकांमध्ये बळावत आहे. त्यामुळे सभापती निवडीपूर्वी स्वतंत्र आघाडीसाठी लॉबिंग सुरू आहे. राष्ट्रवादीची गटनोंदणी असली, तरी एकाचवेळी अकरा सदस्य बाहेर पडल्यास त्यांना स्वतंत्र गटाची मान्यता मिळू शकते. तथापि, राष्ट्रवादीतील लामखडे गटाने पक्षातील १४ सदस्य संपर्कात असल्याचा दावा केला आहे. समाधानकारक समिती न मिळाल्यास प्रसंगी विधानसभेसाठी तयार असल्याचेही या गटाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सभापती निवडीपूर्वी पडद्यामागे अनेक घडामोडी घडणार आहेत.
काँग्रेसच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष
काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास कर्जत-जामखेड मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा भाजपकडून पराभव झाला होता. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढवणे अपेक्षित असताना राष्ट्रवादीने या मतदारसंघात अध्यक्षपद देत संभ्रम वाढवला आहे. या मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते काहीच बोलत नसले, तरी अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या श्रीगोंदे मतदारसंघात काँग्रेसच्या सदस्याला उपाध्यक्षपद देण्यात आले. अदलाबदलीत हे मतदारसंघ परस्परांकडे गेले, तरच आघाडीला फायद्याचे ठरेल.