आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षांच्या चक्रव्युहात काँग्रेसच्या तलवारी म्यान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा काँग्रेसचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी दिला होता. तथापि, लंघे यांच्या चक्रव्युहात काँग्रेसच्या सदस्यांच्या तलवारी म्यान झाल्या. त्यामुळे आंदोलन झालेच नाही. सायंकाळी झालेल्या पदाधिकारी व सदस्यांच्या समन्वय बैठकीत पक्षीय भेदभाव न ठेवता एकत्रित जिल्हा परिषद चालवू असे लंघे यांनी जाहीर केले.

काँग्रेसचे शेलार यांनी मागील आठवड्यात अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांच्या कारभारावर टीका केली होती. आठवडाभरात सुधारणा न झाल्यास अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, भाजप-सेनेचे पदाधिकारी व इतर माजी पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करून आंदोलन होणार नाही यासाठी प्रयत्न केले, अशी चर्चा होती. मंगळवारी सायंकाळी शेलार, लंघे यांची समन्वय बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे, बाबासाहेब तांबे, सदस्य बाबासाहेब दिघे, बाळासाहेब हराळ, सुजित झावरे आदी उपस्थित होते. दीड तास झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. लंघे म्हणाले, काँग्रेसने केलेल्या पोषण आहाराबाबतच्या तक्रारींची शहनिशा केल्याशिवाय बिले अदा केली जाणार नाहीत. मागील सारे काही विसरून समन्वयाने काम करणार आहोत.

नेहमीप्रमाणे लंघेंनी समन्वयाची भूमिका घेऊन आंदोलकांचे मतपरिवर्तन केले. युतीच्या सभासदांनीही त्यांना साथ दिली.

काँग्रेस सदस्यांचे मौन
कारभाराबाबत समाधान झाले का, याबाबत पत्रकारांनी शेलार यांच्याकडे विचारणा केली. तथापि, त्यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी मौन पाळले. अध्यक्ष लंघे यांनी सदस्य व पदाधिकारी बोलणार नसल्याचे सांगून आंदोलनावर पडदा टाकला.

शेलार एकाकी पडले ?
शेलारांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांच्याच काही सदस्यांनी त्यांना एकाकी पाडल्याचे चित्र होते. परंतु शेलार यांनी या चर्चेचा ‘दिव्य मराठी’शी बोलताना इन्कार करून मागण्या मान्य झाल्याने आंदोलन केले नसल्याचे सांगितले.