आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांकडून शाळेला टाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राजकीय वलयाचा दबाव आणून मनमानी करणार्‍या मुख्याध्यापिकेला चाप लावण्यासाठी शुक्रवारी बुरूडगावच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला टाळे ठोकले. त्यामुळे मुख्याध्यापिका मंगला काळे यांना 15 सप्टेंबरपर्यंत नगर पंचायत समिती येथे थांबण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले असून त्यांच्या जागेवर मीरा विधाटे या चौकशी होईपर्यंत काम पाहणार आहेत.

नगर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर बुरूडगाव आहे. हे गाव महापालिकेतून वगळण्यात आले असून सध्या तेथे ग्रामपंचायतही अस्तित्वात नाही. त्यामुळे नागरी सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत मंगला काळे या मुख्याध्यापिका असून आठ शिक्षिका व एक शिक्षक तेथे आहे. सप्टेंबरअखेर पटपडताळणी होणार आहे. पट घसरल्यास अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची समायोजनासाठी बदली केली जाते. पट घसरू नये यासाठी शिक्षिका ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु मुख्याध्यापिका काळे या मनमानी पद्धतीने शाळेचा कारभार करीत आहेत, तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी करून पाचवी ते सातवीचे वर्ग बंद करण्याचा घाट घालत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गावातील शेकडो ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.

माजी सरपंच बापू कुलट, ज्ञानेश्वर जंगम, चंद्रकांत पाचारणे, प्रमिला पाचारणे, अनिता जंगम, झुंबरबाई काळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका काळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांच्या मातु:श्री असल्याने त्यांना राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे अधिकारीही त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थ व मुख्याध्यापिकेच्या वादात विद्यार्थ्यांना शाळेच्या ओट्यावर बसावे लागले. मुख्याध्यापिकेच्या मनमानीला चाप लावण्यासाठी महिलाही मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. याबाबतची माहिती मिळताच प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थांनी काळे यांची बदली करावी, ही मागणी लावून धरली. मुख्याध्यापिका काळे यांनी मी नियमानुसारच काम करते, अशी भूमिका मांडली.

दिवसभर झालेल्या चर्चेनंतर गटशिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापिका काळे यांना पंचायत समितीत थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर मीरा विधाटे यांची 15 सप्टेंबरपर्यंत नेमणूक करण्यात आली आहे. या निर्णयानंतर 4 वाजता शाळा उघडण्यात आली.

शिक्षिकांना रडू कोसळले
राजकीय वलयाचा धाक दाखवून हुकूमशाही पद्धतीने शिक्षिकांना राबवून घेतले जाते. वास्तविक आम्ही शाळेचा पट घसरू नये, तसेच पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू राहावेत यासाठी प्रयत्न करतो. पण मुख्याध्यापकांना शिक्षकांची बदली करण्यासाठी पटसंख्या कमी करायची आहे. याचा आम्हाला खूप त्रास होतो, असे सांगताना शिक्षिकांना रडू कोसळले. कारवाईच्या भीतीमुळे नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी आपली कैफियत मांडली.

माझ्यावरील आरोप खोटे
शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यवाही केली जात आहे. कमी वयाच्या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याचा ग्रामस्थांचा आग्रह आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी कुणालाही उद्धटपणे उत्तरे देत नाही. शाळेतील काही शिक्षक ग्रामस्थांना भडकावत आहेत.’’ मंगला काळे, मुख्याध्यापिका.

मुलींना प्रवेश नाकारला
जूनच्या मासिक पत्रकातील हजेरी पट घसरला आहे. अशिक्षित पालकांना खोटी कारणे सांगून त्यांना परत पाठवले जाते. भिल्ल समाजाच्या मुलींकडे दाखला नसल्याने त्यांना प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून मुख्याध्यापिकेच्या बदलीची मागणी करण्यात आली.’’ बापू कुलट, माजी सरपंच.

चौकशीसाठी वेळ द्या
ग्रामस्थांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मी शाळेत आलो. या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मला आठ दिवसांची मुदत देऊन ग्रामस्थांनी शाळा सुरू ठेवावी. चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.’’ अनिल शिंदे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी.