सांगली - सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद येथे सोमवारी फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटातील पाच जखमींचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आता ११ वर गेला आहे. दरम्यान, गावातील फटाके कारखान्यांना वर्षातून एकदाच फटाके उत्पादनाचा परवाना असताना बेकायदेशीररित्या वर्षभर फटाके उत्पादन होत असल्याचे समोर आले आहे.
तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त दस -याला शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. त्यासाठी गावातील सातजणांना जिल्हाधिका-यांनी दारू उत्पादनाचे परवाने दिले आहेत. त्यापैकी एकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या सहा जणांनाही वर्षातून एकदाच केवळ १५ किलो फटाके उत्पादन करण्याच्या अटीवर परवाने दिले आहेत. मात्र, हे परवानाधारकही अटींचे पालन करत नाहीत. शिवाय दस-यापूर्वी अनेक घरांतून बेकायदेशीररीत्या शोभेच्या दारूचे उत्पादन केले जाते. मात्र, आतापर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही.
२००० सालापासून सोमवारच्या घटनेपर्यंत गेल्या १५ वर्षांत १० वेळा स्फोटांच्या घटना घडल्या. त्यात ३७ जणांना जीव गमवावा लागला तर २३ जण जखमी झाले. यापैकी बहुतांश घटना या दस -याला आतषबाजीवेळी घडल्या. त्यामुळे ठोस स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले नाहीत. तर कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटांना कारखाना मालकांना जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र न्यायालयातून सर्वजण निर्दोष सुटले आहेत. जिल्हा प्रशासन दरवर्षी या सहा जणांच्या परवान्यांचे नुतनीकरण करते; मात्र नुतनीकरण करताना त्यांनी घातलेले नियम आणि अटींचे पालन केले आहे की नाही, याची केवळ कागदोपत्री शहानिशा केली जाते.
सोमवारी स्फोट झालेल्या ईगल फायरवर्क्सच्या परवान्याचेही नूतनीकरण झाले आहे. या कारखान्यात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या मर्यादेच्या कैक पट अधिक स्फोटकांचा साठा होता. दरम्यान, स्फोटातील जखमी राजेंद्र राम गिरी, शिवाजी तुकाराम गुरव, अजित निशिकांत तोडकर, तानाजी ईश्वरा शिरतोडे यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. स्फोटात उडून गेलेल्या रोहित गुरव याचाही मृतदेह फटाके कारखान्यापासून काही अंतरावर आढळून आला. त्यामुळे या घटनेवेळी कारखान्यात असलेल्या सर्व ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदार पाटलांवरही दाखल होता गुन्हा
२००३ मध्ये दस-यावेळी पत्री बाण लागून अनेक जण जखमी झाले होते. त्यात पोलिस उपनिरीक्षक चौगुले यांचाही समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी गावात लोकांनी फटाके उडवू नयेत, म्हणून प्रबोधन करण्यास सुरुवात केली. त्यांना सध्याचे खासदार संजय पाटील यांच्यासह १० ते १५ जणांच्या जमावाने अडवले होते. याप्रकरणी संजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.