आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर- बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत रविवारी 16 अर्भके सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाचे अधिकारीही या घटनेमुळे चक्रावले असून हा नेमका प्रकार काय? याची शोधमोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत असलेल्या स्त्री भ्रूणहत्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवरच हा प्रकार घडल्याने सीमाभागातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पुणे-बंगळुरू हायवेवर असणा-या संकेश्वर शहराजवळून हिरण्यकेशी नदी वाहते. 20 जानेवारी रोजी या नदीत 3 अर्भके अज्ञात लोकांनी टाकली होती. दुस-या दिवशी कुत्र्यांनी फाडलेल्या अवस्थेत ही अर्भके सापडली. ही घटना ताजी असतानाच 27 जानेवारी रोजी आणखी 13 अर्भके आणि 3 गर्भाशये नदीपात्रात आढळून आली आहेत. ही सर्व अर्भके एक ते दोन महिन्यांच्या काळातील असल्याने ती स्त्री की पुरुष जातीची आहेत हे समजू शकत नसल्याचे आरोग्य अधिका-यांनी सांगितले. शनिवारी रात्री उड्डाणपुलावरून ही नदीत टाकण्यात आली असावीत असा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कळताच बेळगावचे जिल्हा, तालुका आरोग्य अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
गर्भपाताची शक्यता
गर्भलिंग चाचणीला कायद्याने बंधन असल्याने एकाच दिवशी गर्भपात करून ही अर्भके येथे आणून टाकली असावीत असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. बेळगाव, कोल्हापूर, सांगली या परिसरात बेकायदेशीररीत्या गर्भपाताची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून यातूनच असा हा प्रकार झाला असावा, असा कयासही व्यक्त केला जात आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी होणार
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची अर्भके अभ्यासासाठी आणण्यात येतात. यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे, परंतु ही प्रक्रिया पूर्ण न करता परस्पर अशा पद्धतीने अर्भकांची विल्हेवाट लावली का याचाही पोलिस आता शोध घेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.