आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळाची दाहकताः चितळीच्या 2500 ग्रामस्थांचा छावणीतच मुक्काम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- सातारा जिल्हा. पूर्वेकडचा भाग दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेला, तर पश्चिमेचा भाग राज्याला वीज, पाणीपुरवठा करणारा. महाबळेश्वर ते माण-खटाव. सव्वाशे ते दीडशे किमी अंतरावर असणारा हा असमतोल स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही कायम आहे. माण-खटावकडे जाताना महिमानगड उतरला की याची भीषणता तीव्रतेने
जाणवायला लागते. डोळ्याला सहन न होणारा रखरखाट आणि एकूणच या प्रदेशावर पसरलेली औदासीन्याची छाया कधी नाहीसी होणार हा प्रश्न या भागातील रहिवासीयांप्रमाणे आपल्याही मनात यायला सुरुवात होते.

माण-खटाव तालुक्यातील चितळी हे असंच एक गाव. गावाची लोकसंख्या सुमारे चार हजारांवर पण आज चितळीकर आपला पत्ता लिहितात तो मु. पो. चितळी, जनावरांची छावणी! गेले दोन महिने सुमारे अडीच हजारांवर लोक जनावरांच्या छावणीत मुक्कामाला आहेत. जनावरं वार्‍यावर सोडता येत नाहीत, पण त्यांना जगवणं अवघड झाल्याच्या प्रतिक्रिया छावण्यांतील अल्पभूधारक शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या.

सिद्धनाथ पाटील. वय 79. चितळीजवळील चारा छावणीत सध्या मुक्काम. त्यांनी 1972 आणि त्यानंतरचेही दुष्काळ चांगलेच अनुभवले आहेत. ते म्हणाले, 1972 मध्ये खटावहून अधिक दुष्काळ माणला होता. जनावरं मेली होती. अन्न, पाणी काहीच नव्हतं. मैलोन्मैल चिटपाखरू दिसायचं नाही. त्या वेळी रोजगार हमीच्या कामावर जायचो. त्या तुलनेत आता परिस्थिती बरी आहे. पाण्याची सोय होतीय. पण सगळ बेभरवशाचं. अजून दोन महिने कसे जाणार आणि जून महिन्यात पावसानी ओढ दिली तर काय होणार हे समजत नाही. मला तीन मुले आणि एक मुलगी. दोघे पुण्याला कारखान्यात आहेत, तर धाकटा इथंच शेती करतो. दोन भागात सव्वा एकर जमीन आहे. पण गेली दोन वर्षे पाऊस नसल्याने शेतीत उत्पन्न काही नाही. कडधान्य, ज्वारी, बाजरी पोटापुरती होते, पण यंदा काय होईल सांगता येत नाही. मुलाला दोन मुलं आहेत. तो त्याची पत्नी रोजगार हमीच्या कामावर जातात; त्याची मुलं आणि मी इथं छावणीत असतो. काय होणार कळत नाही. कुठे जायचे समजत नाही, असं सांगत सिद्धनाथ पाटील यांनी दीर्घ उसासा टाकला अन् हा उसासाच त्यांची काळजी बोलून गेला.

एके काळी डाळिंबाची बाग असणारे जिजाबा गुंजवटे म्हणाले, आम्ही चारा छावणीत जनावरं ठेवली आहेत. गेल्या वर्षीची डाळिंबाची बाग जळून गेली. दोन वर्षे एकही डाळिंब हाताशी लागलं नाही. उलट त्याचं कर्ज डोक्यावर आहे. टँकरने पाणीपुरवठा करणारे शेतक री आहेत, पण एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके. आम्ही देशोधडीला लागलोय. जिवापाड जपलेल्या जनावरांचा बोजा वाटतो, पण त्यांना दिवसातून एकदा तरी पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. धान्याचा प्रश्न येत नाही, पण पाण्याचं काय करायचं हा प्रश्न इतर ग्रामस्थांप्रमाणेच त्यांनाही पडलाय. त्याचं उत्तर काही सापडत नाही. चितळीच्या जनावरांच्या छावणीत लहान मुले आणि वृद्धांचा भरणा लक्षणीय.

मध्यम वयापर्यंतचे सगळे रोजगार हमीवर. जनावरं सांभाळायची आणि जमलं तर मुले असा दिनक्रम ज्येष्ठांचा आहे. एकूणच राज्य शासन आणि प्रशासनाने माणसं आणि जनावरं वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, स्वयंसेवी संस्था त्यांना मदत करत आहेत, पण दुष्काळास कारणीभूत असणार्‍या मूलभूत प्रश्नांकडे ही मंडळी जाणीवपूर्वक लक्ष देतील का? अपुरे प्रकल्प पूर्ण करतील का? हे प्रश्न तूर्त तरी निरुत्तरित आहेत.