आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 82 Corporators Resigned Against Toll Collection In Kolhapur, Mayor And Agitators Injured

कोल्हापूरातील टोलविरोधात 82 नगरसेवकांचे राजीनामे, महापौर व आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर व उग्र आंदोलनानंतर सुमारे तीन आठवडे थांबलेली कोल्हापुरातील टोलवसुली बुधवारपासून पुन्हा सुरू झाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या 82 सर्वपक्षीय नगरसेवकांनी टोलवसुलीला तीव्र विरोध करत महापौरांकडे राजीनामे सादर केले. इतकेच नव्हे तर टोलनाक्यावर आंदोलनही केले. या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात महापौर व काही आंदोलक जखमी झाले. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टोलविरोधी कृती समिती व शिवसैनिकांच्या तीव्र आंदोलनापुढे नमते घेत जिल्ह्यातील नेते व कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी 11 जानेवारी रोजी आयआरबी कंपनीकडून होणारी टोलवसुली रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप अधिकृत आदेश मिळाले नसल्याचे सांगत कंपनीने दुस-या दिवशी पुन्हा टोलवसुली सुरू केली आणि आंदोलनाचा भडका उडाला. 12 जानेवारी रोजी शिवसैनिक आणि नागरिकांनी सर्व टोलनाके उद्ध्वस्त करून पेटवून दिले होते. परिस्थिती चिघळत असल्याने तेव्हापासून वसुली थांबवण्यात
आली होती.
दरम्यान, आंदोलकांचा विरोध काहीसा मवाळ झाल्याचा अंदाज घेत आयआरबी कंपनीने प्रशासनाच्या संबंधित विभागांना दोन दिवसांपूर्वी पत्र देऊन बुधवारी सकाळपासून पुन्हा टोलवसुली सुरू केली. ही बातमी समजताच सर्वपक्षीय नगरसेवक महापालिकेत जमा झाले. यात 79 नगरसेवक व तीन स्वीकृत सदस्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे महापौरांकडे सादर केले. यानंतर या सर्वांनी शिरोली टोलनाक्याकडे धाव घेतली. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
महापौर सुनीता राऊत आणि सर्व नगरसेवक टोलनाक्यावर जाताना पोलिसांनी त्यांना अडवून मागे ढकलण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस आणि नगरसेवकांत बाचाबाची झाली. अशातच महापौर राऊत यांना पोलिसाची काठी लागल्याने सर्वजण संतप्त झाले. पोलिसांचे कडे भेदून सर्वजण टोलच्या केबिनकडे गेले व कंपनीच्या कर्मचा-यांना हुसकावून लावले. तेथेच काही वेळ ठिय्या मारल्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या वेळी आयआरबी व पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली.
वसूली बंद करणारच; मंत्री पाटील यांची ग्वाही
गृहराज्यमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, कामगार मंत्री हसन मुश्रीफ व मी स्वत: टोल वसूली थांबविण्याबाबत ‘आयआरबी’ला शासनाचे अधिकृत पत्र देण्याबाबत प्रयत्नशील आहोत. महापालिका प्रशासनाने रस्त्यांचे पैसे देण्याबाबत लेखी संमती दिली आहे. मात्र यात रस्ते विकास महामंडळाचाही संबंध असल्याने आयआरबीला त्याआधारे पत्र देणे गरजेचे आहे. शासन पातळीवर आमचे त-हेचे प्रयत्न सुरू असून लवकरच शहरातील टोल रद्द करण्यात येईल.
24 रोजी सुनावणी
टोलप्रश्नावर कृती समितीने उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. याप्रकरणी आता 24 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी महापालिका आणि राज्य शासनाने या संदर्भात कोर्टात म्हणणे मांडले आहे.
आज जिल्हा बंदची हाक
पुन्हा सुरू झालेली टोल वसूली व पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक कृती समितीच्या वतीने देण्यात आली. ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच शिवसेनेच्या वतीने ‘तिरडी मोर्चा’ काढण्यात येणार आहे.