आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 95 Th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan Opening In Belgaum

‘कट्यार काळजात' च्या आठवणी शब्दांपलीकडच्या : फय्याज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी (बेळगाव) - ‘डोळे मिटून पापण्यांची संख्या मोजायची नसते या संवादागत माझ्या बेळगावमधील आठवणी आहेत. त्यातही ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या आठवणी तर शब्दांपलीकडच्या आहेत. यासारख्या नाटकांचा गुंतवळा आयुष्यभर साथ देत राहतो’,असे मनोगत नाट्यसंमेलनाध्यक्ष फय्याज यांनी येथे शनिवारी व्यक्त केले. बेळगाव येथे उभारलेल्या बाळासाहेब नाट्यनगरीमधील लोकमान्य रंगमंदिर येथील सदाशिव अमरापूरकर रंगमंचावर फय्याज यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली. या वेळी त्या बोलत होत्या. फय्याज यांच्या या मुलाखतीसाठी लोकमान्य रंगमंदिर खच्चून भरले होते.

‘कट्यार काळजात..’ या नाटकाच्याच आठवणींमध्ये रमत फय्याज यांनी वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागवल्या. प्रत्येक वेळी एकच पद वसंतराव पाचशे वेगवेगळ्या शैलीत गायचे, असे सांगत फय्याज यांनी साहित्य संघात कट्यारचा पहिला प्रयोग साडेसहा तास झाला होता, असेही नमूद केले.त्या वेळी अत्रे यांनी दुसर्‍या दिवशी ‘कट्यार घड्याळात घुसली’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता या वेळी त्यांनी हीच आठवण पुढे नेत ‘लागी करेजवा कटार’ ही आपली प्रसिद्ध व अत्यंत गाजलेली चीज सादर केली आणि रसिकांची त्यास उत्स्फूर्त दाद मिळाली.कट्यारपासून फय्याज यांनी आपला प्रवास उलगडत गेल्या ५० वर्षांच्या आपल्या कारकीर्दीतील काही सुरेख आठवणी उलगडून दाखवल्या.

नाट्यदिंडीत शिवराय, कॉमन मॅन
ढोल पथक, बैलगाडी, घोड्यांचे रथ, तलवारबाजी पथक, विविध कसरती, शिवराय, अफझलखानाची फौज, आर.के.लक्ष्मण यांचा कॉमन मॅन, जुन्या संगीत नाटकांमधील पात्रे अशा लवाजम्यासह बेळगावमधील मरगाई देवीपासून भव्य नाट्यदिंडी उद्घाटनाआधी काढण्यात आली होती. या दिंडीत नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कायर्वाह दीपक करंजीकर, बेळगावचे महापौर, वीणा लोकूर, किरण ठाकूर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

संमेलनामध्ये उद्घाटनाप्रसंगी सुशांत शेलार, जयवंत वाडकर, मोहन आगाशे, अदिती सारंगधर, अलका कुबल यांच्यासह कलाकारांची उपस्थिती होती. पूजा सावंत, गिरीश ओक, पुष्कर श्रोत्री, पंढरीनाथ कांबळे, सुकन्या कुलकर्णी, ऋजुता देशमुख, राघवेंद्र कडकोळ, प्रदीप कबरे, अशोक शिंदे, विद्याधर जोशी आदी कलाकार उपस्थित होते.