आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 95th Akhil Bharateeya Marathi Natya Sammelan Belgaum

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्यसंमेलनाचे उद्या बेळगावात उद‌्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९५ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनासाठी बेळगाव नगरी सज्ज झाली असून ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन बेळगाव येथील सीपीएड मैदानावरील बाळासाहेब नाट्यनगरीमध्ये संपन्न होणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी होणार असून या वेळी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री उदय सामंत आणि तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी स्वागताध्यक्ष अशोक साठे यांच्या उपस्थितीमध्ये गेल्यावेळच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष अरूण काकडे नव्या अध्यक्षा फैय्याज यांच्याकडे सूत्रे प्रदान करतील.

सीपीएड मैदानावरील संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या ठिकाणी १० हजार रसिक प्रेक्षकांच्या क्षमता असलेला मंडप उभारण्यात आला असून आकर्षक मयुरपंखी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

बेळगावी नको, बेळगावच
नाट्यसंमेलनामध्ये कुठेही बेळगावी असा उल्लेख न करता बेळगाव असा उल्लेख करावा, अशी मागणी मराठी युवा कार्यकर्त्यांनी स्थानिक नाट्यपरिषदेकडे केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत सीमाप्रश्नाबाबतचा ठराव मांडण्याचाही आग्रह धरला.

शनिवारी होणार्‍या नाट्यदिंडीवेळी एकीकडे मराठी बांधव आणि कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असताना कर्नाटक प्रशासन आणि पोलिस या कार्यक्रमाकडे कोणत्याही पध्दतीने पाहतात याबाबत दोन्ही राज्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिवंगतांचे स्मरण
एकीकडे या परिसराला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देतानाच दुसरीकडे नाट्यपरिषदेने गेल्या वर्षभरात निधन झालेल्या कलाकारांचीही आठवण ठेवली आहे. सदाशिव अमरापूरकर, कुलदीप पवार, स्मिता तळवलकर, सुधीर मोघे, नयनतारा यांची नावे विविध रंगमंचांना देण्यात आली आहेत.