Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | 8 men Gangraped Pregnant women in Sangli

सांगलीत पतीला कारमध्ये डांबून गर्भवती महिलेवर आठ जणांनी केला सामुहिक बलात्कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 03, 2018, 09:03 AM IST

पतीला कारमध्ये डांबून जवळपास आठ जणांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

 • 8 men Gangraped Pregnant women in Sangli

  सांगली- आठ महिन्यांच्या गर्भवतीवर आठ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील तुरची फाटा (ता. तासगाव) येथे गुरुवारी उघडकीस आली. हे कृत्य करताना नराधमांनी पीडितेच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवले होते. ही घटना ३१ जुलै रोजीची आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद (पूर्ण नाव नाहीत) या चार जणांची नावे सध्या समोर आली असून इतर चार जणांचा शोध घेण्यात येत आहे.


  पीडित गर्भवती महिला ही सातारा जिल्ह्यातील माण येथील रहिवासी असून ती गेल्या काही महिन्यांपासून पतीसह तुरची फाटा येथे वास्तव्यास आहे. दोघांनी फाट्यावर छोटेखानी हॉटेल सुरू केले आहे. हॉटेलचा व्याप वाढल्याने त्यांना कामासाठी जोडपे पाहिजे होते. यासाठी त्यांनी अनेकांना सांगूनही ठेवले होते. मंगळवारी रात्री संशयित मुकुंद माने याने पीडित महिलेच्या पतीला फोन करून 'तुम्हाला हॉटेल कामासाठी जोडपे पाहिजे' असल्यास फाट्यावर वीस हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार पीडित महिला व तिचा पती तुरची फाटा येथे पैसे घेऊन गेले असता मुकुंद याने त्याच्यासोबत असलेल्या सागर याला दोघास मारण्यास सांगितले. त्यानुसार त्याने मारहाण केली.


  महिला आयोगाकडून दखल
  सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने तातडीने घेतली दखल असून स्थानिक पोलिस अधीक्षकांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सत्यता पडताळून पोलिसांकडून झालेल्या कार्यवाहीचा त्वरित अहवाल मागवण्यात आल्याचे महिला आयोगाकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले..


  साडेचार तोळे सोने, २० हजारांची रोकड पळवली
  सागरने जोडप्यास मारहाण करून महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी व वीस हजारांची रोकड काढून घेतली. याच वेळी दुचाकीवरून आणखी चार जण घटनास्थळी आले. त्यांनी पीडित महिलेच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तिला एका खोलीत नेत आठ जणांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. त्यानंंतर कारमधून पतीला महिलेजवळ आणून सोडले. तसेच पोलिसांत माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, दांपत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Trending