आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - राज्यात भाजप सरकारने गेल्या तीन वर्षात कृषी पंपाची भरमसाठ वीजदरवाढ केली असून यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.म्हणून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने 27 मार्च रोजी विधानभवनावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढणार असून या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जाहीर पाठींबा दिला असल्याची माहिती फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यावेळी ते म्हणाले कि,शेतीपंप वीज ग्राहकांवर व सहकारी संस्थांवर महावितरण कंपनीने 72 पैसे प्रती युनिट असलेला वीजदर जून 2016 पासून तीन वेळा दरवाढ करून एप्रिल 2017 पर्यंत 1.97 पैसे पर्यंत वाढवला. याशिवाय त्यावर इंधनभार,डिमांड चार्जेस इतर चार्जेस हे वेगळे लावले त्यामुळे ही दरवाढ दुपटीपेक्षा अधिक होत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जा मंत्र्यांना तोडगा काढण्यास सांगितले होते. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री ऊर्जामंत्री,अर्थमंत्री,कृषी राज्यमंत्री इरिगेशन फेडरेशन व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेऊन वीजदर प्रतियुनिट 1 रुपये 16 पैसे मार्च 2020 अखेर स्थिर ठेवणे बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जेष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांना दिले होते.पण त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप केलेली नाही.तसेच याबाबत बैठकही घेतलेली नाही.महावितरण कंपनी राज्यात 24 हजार कोटीची थकबाकी असल्याचे सांगत आहे पण महावितरण ने शासनाकडून शेतकऱ्यांसाठी असलेली सबसिडी वेळोवेळी घेतली आहे.असे असताना थकबाकीचे कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या कृषी पंपावरील वीजदरवाढ करणे अन्यायी आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थकबाकी नगण्य असून संपूर्ण राज्यातील थकबाकीचे निकष पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर लादणे चुकीचे आहे.ही वीजदरवाढ कमी करावी यासाठी जेष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 मार्च 2018 रोजी मुंबई येथे विधान भवनावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढणार असून या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजपा वगळता सर्व पक्षांनी पाठींबा दिला आहे.या मोर्चासाठी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून 10 हजार शेतकरी जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मोर्चाच्या जागृतीसाठी रविवार ( दि. 25) रोजी दुपारी 1 वाजता राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथे प्रा.एन.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील भूयेकर,भगवान काटे,मारुती पाटील आणि फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.